Home ई - पेपर्स

मुंबई : बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा 30 दिवसांच्या पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. जून महिन्यात पॅरोलच्या रजेसाठी अर्ज करताना संजयने मुलीच्या आजारपणाचे कारण दिले होते.
दोन दिवसांपूर्वी पुणे विभागीय आयुक्तांनी संजयचा पॅरोलचा अर्ज मंजूर केला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या दोन दिवसात संजयची तुरुंगातून सुटका होईल. तीस दिवसांच्या या पॅरोलमध्ये 60 दिवसांपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे पुढचे तीन महिने संजय तुरुंगाबाहेर राहू शकतो.
मे 2013 मध्ये संजय उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेला. तेव्हापासून संजयने आतापर्यंत कायदेशीर आधार घेऊन 146 दिवस तुरुंगाबाहेर काढले आहेत. ऑक्टोंबर 2013 मध्ये संजयला फर्लोनची रजा मिळाली त्यात त्याला 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्याला 30 दिवसांची पॅरोलची रजा मंजूर झाली. ती आणखी दोन महिने वाढवण्यात आली.
डिसेंबर 2014 मध्ये त्याला पुन्हा 14 दिवसांची फर्लोनची रजा मंजूर करण्यात आली. ती रजा वाढवण्यासाठी संजयने अर्ज केला होता. मात्र त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर संजयचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
गृहखात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार फर्लोन हा कैद्याचा अधिकार आहे. ज्यात कैद्याला वर्षातील 28 दिवसांची रजा मिळू शकते. पॅरोल अपवादात्मक परिस्थितीत मंजूर केला जातो. पॅरोल तीस दिवसांसाठी दिला जातो. ज्यात 60 दिवसांपर्यंत वाढ होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती, कैद्याचे आजारपण किंवा कुटुंबियांचे आजारपण या परिस्थितीत कैदी पॅरोलच्या रजेसाठी अर्ज करु शकतो.

मुंबई : शाहरूख आणि काजोल यांच्या फॅन्सचा उत्साह वाढवणारी ही बातमी आहे, कारण तुमच्यासाठी रोमान्सचा पाऊस पडणार आहे, सूरज हुआ मद्धम, आणि जाती हूं मै या गाण्यात तुम्ही काजोल आणि शाहरूखची जोडी पाहतच राहाल.
पण आता शाहरूख आणि काजोलवर असंच एक रोमान्सपूर्ण गाणं रोहित शेट्टीच्या दिलवाले या चित्रपटासाठी शूट केलं जाणार आहे. हे गाणं आईसलँडमध्ये १२ दिवसात शूट होणार आहे, या शूटचं शेड्यूलही लपवण्याचा प्रयत्न होतोय, फूट टू सिक्रेट.
मात्र ही माहितीही समोर आली आहे की हे गाण्याची कोरियोग्राफी फराह खान करणार आहे, फराह खानने शाहरूखला सूचनाही दिल्या आहेत की हे गाणं सूरज हुआ मद्धमपेक्षाही जास्त रोमँटिक झालं पाहिजे.

लासलगावमध्ये प्रतिक्विंटल कांदा 4900 रुपये
नाशिक : जेवणातील महत्वाचा घटक असलेल्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळयात पाणी आणले आहे. दिवसेंदिवस प्रतिकिलो कांद्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत.
देशातील कांद्याची सर्वातमोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या लासलगावमध्ये प्रतिक्विंटल कांद्याचा भाव 4900 रुपये चालू आहे. बुधवारी प्रतिक्विंटल कांद्याचा दर 4500 रुपये होता. एकाच दिवसात कांद्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.
कांद्याची आवक घटल्यामुळे लासलगावमध्ये कांद्याच्या प्रतिक्विंटल दराने दोन वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. असंतुलित पावसामुळे खरीप हंगामातही कांद्याचे उत्पादन घटणार आहे.
त्यामुळे येणार्‍या दिवसामध्ये कांदा आणखी महाग होईल. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून कांद्याचे सर्वाधित उत्पादन घेतले जाते. मात्र अपुर्‍या पावसामुळे येथेही कांद्याचे उत्पादन कमी रहाण्याची शक्यता असून, या राज्यातील काही भागांमध्ये दृष्काळसदुश स्थिती आहे.

८० मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!

मुंबई : मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल ८० मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला-वहिला ‘अजिंक्यतारा’ हा पुरस्कार कार्यक्रम २१ ते २३ ऑगस्टला मॉरिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात पार पडणार होता. सुपरविस्टा एन्टरटेनमेंटने या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक परफॉर्मन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू होती. मानसी नाईक, अमृता खानविलकर, पूजा सावंत, अभिजीत केळकर, नेहा पेंडसे यासारखे अनेक आघाडीचे कलाकार कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. परफॉर्मन्सची तयारी झाली. तालमी झाल्या. बॅगा भरल्या गेल्या आणि सगळे विमानतळावरही दाखल झाले.
आज सकाळी ७.४५ च्या फ्लाईटनं जवळपास ८० कलाकारांची टीम मॉरिशिअसला प्रस्थान करणार होती. रात्री अडीच-तीन वाजल्याच्या सुमारास सगळे कलाकार विमानतळावर दाखलही झाले. चेकींग वगैरे सोपस्कारही पार पडले आणि अचानक चारच्या सुमारास सगळ्यांच्या मोबाईलवर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याचे मॅसेज धडकले. त्यामुळे, या सर्व कलाकारांना एकच धक्का बसला. कार्यक्रम का रद्द करण्यात येतोय याचं कारण मात्र कलाकारांना देण्यात आलं नाही.
आयोजकांनी अशा पद्धतीनं आपला अपमान केल्याची भावनाच मराठी कलाकारांनी बोलून दाखवलीय. आपली मेहनत वाया गेल्याचं दु:ख वेगळंच. कलाकारांना गृहित धरण्याच्या या मानसिकतेबद्दल अभिनेता अभिजीत केळकर यानं नाराजी व्यक्त केलीय.
आयोजकांपैकी मुख्य असलेल्या ‘सिनेयुग’ कंपनीनं अचानक माघार घेतल्यानं हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात येतंय. या पुरस्कर सोहळ्यासाठी ‘सिनेयुग ग्रुप ऑफ कंपनी’ इव्हेंट मॅनेजमेंट पार्टनर होती तर ‘किड्झेनिया’ मुंबई वेन्यू पार्टनर म्हणून काम पाहणार होते.

कोलंबो : भारतीय संघात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता असल्याचा विश्‍वास भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. खेळाडू उद्यापासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत.
भारतीय संघाने गाले टेस्टमध्ये बहुतांश काळ दबदबा राखल्यानंतर अखेरच्या क्षणी नांगी टाकली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही कमबॅकची क्षमता ठेवतो, जे काही झालं त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कोणत्याही टेस्टच्या सहा सत्रात दबदबा कायम राखण्यात यशस्वी झालात त्याचा अर्थ तुम्ही मॅच जिंकली पाहिजे. पण मागील टेस्टमध्ये असे झाले नाही.
पण आम्ही पुढील टेस्टसाठी चांगली तयारी केली आहे. आम्हांला यातून शिकले पाहिजे आणि आम्ही लढले पाहिजे. आता पराभवातून पुढील मॅचसाठी सज्ज होण्याची वेळ आहे.
ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीला अंतीम 11मध्ये सामील करण्याबद्दल विराट म्हणाला, बिन्नीच्या आगमनाने आमच्या गोलंदाजीतील संतुलन वाढले आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने मदत होणार आहे.

मुंबई: एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.
१५ वर्षांपूर्वी जेव्हा हृतिकनं ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तेव्हा कॉलेजमध्ये असलेली शिखा मोंगा आता ३४ वर्षांची आहे. तिनं कोका कोला कंपनीविरोधात अडीच कोटींचा दावा केलाय.
आपल्या प्रमोशनल कॅम्पेनमध्ये हृतिक रोशनसोबत डेटचं आश्वासन देणार्‍या कंपनीविरोधात शिखानं कोर्टात धाव घेतली. कोका कोलानं तिला ५ लाख रुपयांची ऑफर दिलीय. मात्र अभिनेत्याला भेटण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. कंपनीनं ते पाळलं नाही, म्हणून शिखानं खोटारडी कंपनी म्हणत हा दावा केलाय.

नवी दिल्ली : बॉलिवूडचा ‘क्वीन’ असल्याचं आता तर कंगना राणौतनं आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय.
कंगना बॉलिवूडमध्ये सध्या ज्या स्थानावर आहे. ते तिनं खूप मेहनतीनं आणि कोणत्याही गॉड फादरशिवाय मिळवलंय. यावर दुमत नाही. आता तर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाला तिच्या आगामी सिनेमासाठी तब्बल ११ करोडोंचा चेक मिळालाय. यामुळे, मानधनाच्या बाबतीत कंगनानं अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोपडा यांनाही मागे टाकलंय.
दीपिका एका सिनेमासाठी ८ ते ९ करोड रुपये मानधन म्हणून मिळवते. तर प्रियांका चोपडा ७ ते ८ करोड मानधन घेते. पण, आपल्या अभिनयाची छाप पाडत महिला केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देत, किंवा त्या चित्रपटांनाच आपल्या टॅलेंटनं खेचून घेत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणार्‍या कंगनानं स्वत:ला आजवर वारंवार सिद्ध केलंय.
आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्याला त्या लायक बनावं लागेल, असं नुकतंच प्रियांका चोपडानं आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. तेच कदाचित कंगना आपल्या कृतीतून करून दाखवतेय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.

मुंबई : 15 ऑगस्ट 1975. यंदा बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या ‘शोले’ या सिनेमाला तब्बल 40 वर्ष पूर्ण झालीत.
‘शोले’ हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला सिनेमा आहे. निर्माता-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेच्या रुपात बॉलिवूडला एक धमाकेदार सिनेमा दिला होता. सिनेमाचे संवाद लेखक जावेद अख्तर यांच्यासोबत सलीम खान यांनी लिहिले होते. या दोघांनी लिहिलेले डायलॉग आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. शोले हा सिनेमा भारतीय सिनेजगतातील मैलाचा दगड ठरलेला सिनेमा आहे. शोलेच्या आसपास कथानक असलेली अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले मात्र शोलेच्या आसपास कोणीच पोहोचू नाही शकले.
40 वर्षांच्या या प्रदिर्घ काळात अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. या सिनेमात काम केलेले अनेक कलाकार आपल्यातुन निघून गेले मात्र त्यांची या सिनेमातील छबी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. जय-वीरु, गब्बर, ठाकूर, सांबा, कालिया, सूरमा भोपाली, बसंती, धन्नो असी सगळी पात्रं या सिनेमात भाव खावून गेली होती. सिनेमातील छोटी-छोटी पात्रंही आजही रसिक विसरु शकलेली नाही. सिनेमा इतका मोठा हिट होईल याची कल्पना सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनीही केली नव्हती. परंतू सिनेमाच्या यशात कलाकारांचंही महत्त्वाचं योगदान असल्याचं रमेश सिप्पींचं म्हणण आहे.
आज आपण शोले सिनेमातील कॅरेक्टरबद्ल जाणून घेणार आहोत.. की अजुनही का या सिनेमातील कॅरेक्टर रसिकांच्या मनात आहे…

** वीरु
अभिनेता धमेंद्र यांनी साकारलेल्या या पात्राने कोणाला हसवलं नाही? त्यांच्या पाण्याच्या टाकीवर चढून म्हटलेला डायलॉग ’कुद जाऊंगा फांद जाऊंगा’ आजही रसिकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. धमेंद्रची इमेज खरंतर एक्शन हिरोची. मात्र, शोलेमध्ये धरम पाजींचं वेगळंच रुप रसिकांना बघायला मिळालं. त्याचप्रमाणे ’बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’ हा डायलॉग तर आलटाईम हिट झालाय.

** जय
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर अंदाज सिनेमात बघायला मिळाला. अमिताभ यांचे ओळीने सात सिनेमे फ्लॉप झाले होते, त्यामुळे रमेश सिप्पी यांना अनेक जणांनी सल्ला दिला होता की कोणता तरी इस्टॅब्लिश एक्टर सिनेमात घ्यावा. मात्र, सिप्पींनी अमितजींचा ’आनंद’मधील अभिनय आवडला होता. तसचं अमिताभचा ’जंजीर’ही नुकताच हिट झाला होता. त्यामुळे त्यांनी जयच्या भूमिकेसाठी अमिताभलाच निवडले.
**’तेरा नाम क्या है बसंती?’
बसंती
रमेश सिप्पींबरोबर हेमाजींनी ’सीता और गीता’ या सिनेमात याआधी काम केले होते. त्यामुळे आपली ’बसंती’ हेमामालिनीच असणार हे रमेश सिप्पींनी निश्‍चित केले होते. सिनेमातील ’चल भाग धन्नो आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है’ हा डायलॉग चांगलाच हिट झाला होता. तसेच ’जब तक है जा मै नाचूंगी’ या गाण्यावरील हेमाजींच्या नृत्याचीही चांगलीच प्रशंसा झाली होती.

** ठाकूर
अभिनेता संजीव कुमार यांना खर तरं वीरुची भूमिका करायची होती. मात्र, रमेश सिप्पींनी त्यांना कनव्हिंन्स करुन ठाकूरची भूमिका दिली. ठाकूर हे हिंदी सिनेमातील अजरामर पात्रांपैकी एक कॅरेक्टर आहे. सिनेमातील संजीव कुमारांच्या अभिनयाने सगळ्यांचीच वाहवा मिळविली. सिनेमातील ’त्यांचा ये हात नही फाँसी का फंदा है’ हा डायलॉग तुफान हिट झाला होता.
*** ’ये हात मुझे दे दे ठाकूर’
** गब्बर
शोले सिनेमातील असं कॅरेक्टर जे भारतीय सिनेमातील अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक आहे. खरंतर या कॅरेक्टरसाठी आधी डॅनीला साईन करण्यात आले होते. मात्र फिरोझ खानच्या ’धर्मात्मा’ सिनेमासाठी डॅनीनं शोले सोडला आणि अमजद खानची वर्णी लागली. सिनेमातील अमजद खानच्या अप्रतिम अभिनयाने गब्बरच्या भूमिकेला चार चाँद लावले. ’अरे ओ सांबा कितने आदमी थे’ किंवा ’ये हात मुजे दे दे ठाकूर’ असे हिट डॉयलॉग अमजद खानच्या तोंडी होते. गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे.
त्याचप्रमाणे सूरमा भोपाली, कालिया, सांबा, मौसी अशी अनेक हिट कॅरेक्टर या सिनेमात होती. असरानी यांनी रंगविलेला ’अंग्रेजो के जमाने का जेलर’ तर आजही रसिकांना लोटपोट होऊन हसवितो.
सिनेमाच्या यशात सिनेमाच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे. आर.डी.बर्मन यांच्या संगीताची जादू चांगलीच चालली. एकापेक्षा एक सरस गाणी सिनेमात होती. शोलेचा रिमेक बनविण्याचाही बर्‍याच जणांनी प्रयत्न केला मात्र त्यांना तोंडघाशीच पडावं लागलं. शोलेचा रिमेक बनविणे केवळ अशक्य आहे. कारण ’शोले’सारखा सिनेमा पुन्हा होणं शक्य नाही.
शोले हा खर्‍या अर्थाने क्लासिक सिनेमा असून या सिनेमाला 40 वर्ष पूर्ण झाली तरीही या सिनेमाची क्रेझ अजुनही कायम आहे ही खऱचं अभिमानाची गोष्ट आहे.

जकार्ता : जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याच्या निश्‍चयाने उतरलेल्या सायनाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे.
उपांत्यफेरीत जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या लिंडावेनी फनेत्रीवर विजय मिळवत सायनाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारल. स्वातंत्र्यदिनी सायनाने समस्त भारतीयांना विजयाची भेट दिली.
ऑलिंपिक पदक विजेत्या सायनाच्या या विजयामुळे तिचे या स्पर्धेत किमान रौप्यपदक निश्‍चित झाले आहेत. गेली पाच वर्षे या स्पर्धेत सायनाला पदकाने हुलकावणी दिली होती.
स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम ठेवत सायनाने उपांत्यफेरीत इंडोनेशियाच्या लिंडावेनी फनेत्रीचा अवघ्या 55 मिनिटांत 21-17, 21-17 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. दोनही गेममध्ये सायनाने आपले वर्चस्व कायम ठेवले.

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. आगामी चित्रपटासाठी तिने शूटिंगही सुरु केला आहे.
२०१२ मध्ये आलेल्या ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यात नायकाची भूमिका जेनेलियाचा पती रितेशने साकारली होती.
त्यानंतर २०१४ मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ आणि ‘लय भारी’ या चित्रपटात ही पाहुण्या भूमिकेत दिसली होती.
बॉलीवूडमध्ये पुनरागमनाबाबतचे जेनेलियाच ट्विट केले आहे. आणि बॉलीवूडमध्ये पुन्हा परतण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. यासाठी रितेशनेही जेनेलियाला ट्विटवररुन शुभेच्छा दिला आहेत.