Home मुंबई

0 296

नाना पटोले यांचा आरोप ; आयुध निर्माणी मध्ये खाजगीकरणाला विरोध

मुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्यात आणत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केला आहे.

देशभरातील आयुध निर्माण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे प्रस्तावित खाजगीकरण मागे घ्यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. देशात बहुधा प्रथमच आयुध निर्माणी संस्थांचे कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र सरकार दडपशाही करून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. अंबानी अदानींचे सरकार अशीच सामान्य जनतेमध्ये प्रतिमा असलेले केंद्रातील मोदी सरकार देशातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगीकरण आणून सरकारी कंपन्या विकत आहेत.

बिएसएनएल, रेल्वे, एअर इंडीया, पेट्रोलियम यासह इतर महत्वाच्या क्षेत्रातही खाजगीकरणाचे धोरण सरकार आखत आहे. एकीकडे देशाची आर्थिक व्यवस्था खालावत चालली आहे. त्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अशातच सुरक्षेशी निगडीत असलेल्या आयुध निर्माणी मध्ये सुद्धा खाजगीकरण करून सरकार देशाची सुरक्षाच खाजगी कंपन्यांच्या हातात देत आहेत असा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे भाजपाचे नेते व समर्थक’देश सुरक्षीत हातो में’ असा प्रचार जोमात करतात. मात्र सुरक्षेशी खेळ करण्याचा हा प्रयत्न भविष्यासाठी घातक ठरणार आहे असे पटोले म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत खाजगी कंपन्यांकडून घेतलेल्या प्रचंड मदतीची परतफेड करण्यासाठीच मोदी सरकार सर्वत्र खाजगीकरण करत आहे असेही ते म्हणाले.

0 290

मुंबई – पूर्व आणि पश्चिम उपनगरात एकही मोठे रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांना शहरातील मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यामुळे पश्चिम उपनगरात भगवती रूग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवावे, अशी मागणी पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेची केईएम, नायर, सायन ही मोठी रुग्णालये आहेत. ही तीनही रुग्णालये शहर विभागात आहेत. गरिबांवर मोफत आणि इतरांवर स्वस्त उपाचार केले जात असल्याने या तीनही रुग्णालयात मुंबईसह राज्यातील तसेच देशभरातील रुग्णांची प्रचंड गर्दी असते. महापालिकेची पूर्व आणि पश्चिम उपनगरात छोटी रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये योग्य अशा सोयीसुविधा तसेच डॉक्टर नसल्याने शहरातील मोठ्या रुग्णालयात जावे लागते.

मुंबईत ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. ट्रॅफिक आणि उपनगरातून शहरातील रुग्णालयांकडे जाण्यासाठी लागणारे अंतर पाहता मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेकांचा जीव जातो. यामुळे उपनगरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. पालिकेच्या भगवती रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जात आहे. या रुग्णालयाची पुनर्बांधणी करताना सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारावे, अशी मागणी शितल म्हात्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

तर भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास त्याचा फायदा विरार ते पालघरमधील नागरिकांना होणार, असे यावेळी म्हात्रे यांनी सांगितले.

0 282

मुंबई – दरवर्षी शहरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते. याचं प्रमुख कारण सांगितले जाते ते म्हणजे परिसरातील नाले सफाई न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. मात्र नालेसफाई दरम्यान त्यातून निघणारा कचरा पाहिला तर प्रशासनाला दोष देण्याआधी मुंबईकरांनी स्वत:ही आपल्याकडे पाहायला हवं असचं वाटतं. नालेसफाई दरम्यान नाल्यात गादी, बेड, टेबल अशा वस्तू फेकल्याने नाले चॉकअप होतात. त्यामुळे पाणी काढणं कठीण होऊन जातं. 

कुर्ला वेस्ट परिसरात पावसामुळे एलबीएस मार्गावर पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र रविवारी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या नाल्याची सफाई केली त्यावेळी त्यातून 10 गाद्या, बेड, कपाटाचे तुकडे अशा वस्तू बाहेर काढल्या. त्यामुळे नाले चॉकअप व्हायला महापालिका जेवढी जबाबदार आहे त्याहून अधिक जबाबदार या नाल्यात अशा वस्तू टाकणारे मुंबईकर जबाबदार आहेत. 

बीएमसी एल वार्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळूंज यांनी सांगितले की, रस्त्यावर पाणी साचलं तर लोकं बीएमसीला दोषी ठरवतात. मात्र नाल्यात अशाप्रकारे फर्निचर, वस्तू टाकताना विचार केला जात नाही. लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी वाळूंज यांनी नालेसफाईचे फोटो काढले आहेत. हे फोटो पाहून तरी लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
अनेकदा नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत असतो. महापालिकेनेही ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्यासाठी लोकांना विविध माध्यमातून तक्रार करण्याची संधी दिली आहे मात्र अशाप्रकारे लोकांकडून नाल्यात घाण टाकली जात असेल तर दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न उभा राहतो. 

मुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वॉर्डात साफसफाई करत आहेत. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत क्लिन-अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली होती. 

0 243

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई : राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अपरिमित हानी झालेली आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महापुराने थैमान घातले असून अनेक भागात मागील चार दिवसापासून पुरपातळी अद्यापही कमी झालेली नाही. आजही या परिसरातील हजारो कुटूंबे पुरग्रस्त भागात मदतविना अडकलेली आहेत. पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा भागाला शुक्रवारी भेट देऊन आल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आलेले संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावी, अशी मागणी केली.  

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वडेट्टीवार यांनी असे नमूद केले आहे की, कोल्हापुरातील २३९ गावांतील सुमारे १ लाख १२ हजार लोक तसेच सांगली जिल्ह्यातील १ लाख, ३५ हजार लोक स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही हजारो कुटूंबिय पुरग्रस्त भागात अडकलेले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. या पुरामुळे राज्यातील सुमारे ६८ हजार खरीप क्षेत्र नष्ट झाले आहे. पुरामुळे घरे, दुकाने, शासकीय इमारती, शाळा, बाजारपेठा यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच पुरात जनावरांचे मृत्यु झाल्याने मृत जनावरांच्या शरीराच्या विघटनामुळे परिसरात महामारी, साथीच्या रोंगाचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकेल. या अभुतपुर्व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती व जनावरांच्या नुकसानामुळे त्याभागात तसेच आसपासच्या परिसरात अन्न, धान्य, भाजीपाला, दुध, इंधन, औषधांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

पूरग्रस्त भागातील जीवनमान सुरळीत होण्यासाठी या नैसर्गिक आपत्तीस राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नदी खोरे परिसरात महापुराची परिस्थिती दीर्घकाळ राहू नये यासाठी उपाययोजना निश्चित करुन त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास उच्चस्तरीय तज्ञांचा गट निर्माण करावयाचा असल्यास तातडीने निर्णय घ्यावा. राज्यातील विविध प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी सद्य:स्थिती असलेली आपत्ती निवारण यंत्रणा ही जागतिक दर्जाची करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. पूरग्रस्त परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी विशेष कृती दले तयार करुन विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. पूरग्रस्तांना मदत करतांना या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी आपत्तीग्रस्तांना आवश्यक बळ मिळेल अशी मदत शासनाकडून उपलब्ध करुन द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

0 263

सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com

मुंबई, : पूरग्रस्त भागातील नागरीकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही. पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  –

 • महाराष्ट्रात जून ते 9 ऑगस्टपर्यंत 782 मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला. मागीलवर्षी या काळात 80 टक्के पाऊस झाला होता.
 • 4 ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला. सांगलीमध्ये सरासरीच्या 223 टक्के पाऊस पडला आणि साताऱ्यात सरासरीच्या 181 टक्के पाऊस झाला.
 • अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8 आणि सांगली जिल्ह्यात 4 असे एकूण 12 तालुके बाधित झाले.
 • कोल्हापूरमध्ये 239 गावे, सांगलीत 90 गावे अशी 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.
 • या बाधित गावांमध्ये आतापर्यंत प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
 • या सर्व व्यक्तींसाठी मदत निवारे उभारले आहेत. तेथे त्यांना वास्तव्यास ठेवण्यात आले आहे.
 • राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे की, या निवाऱ्यांच्या बांधकामांचा, तेथील नागरीकांच्या जेवणाचा तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना कपडे पुरविल्यास त्याचा खर्च आणि औषधांचा खर्च शासन देणार आहे. निवाऱ्यातील नागरीकांसाठी अन्य बाबींसाठी खर्च करावा लागला तर त्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
 • एनडीआरएफची एकूण 31 पथके (एका पथकात 40 जणांचा समावेश) कार्यरत असून त्यातील 16 पथके सांगलीमध्ये, 6 कोल्हापूरमध्ये, बाकी पथके आवश्यकता भासल्यास कार्यरत ठेवण्यात येत आहेत.
 • महाराष्ट्रात एनडीआरएफची ओडीसा येथून 5 पथके आणि 5 पथके भटींडा पंजाब येथून मागविण्यात आली आहेत. या पथकांना शासनाने एअर लिफ्टींग करुन पूरग्रस्त भागात तैनात केले आहे. गुजरातमधून 3 पथके मागविण्यात आली असून ती देखील कार्यरत आहेत. एसडीआरएफची 2 पथके  सांगलीमध्ये कार्यरत आहेत. तर एक पथक कोल्हापूरात आहे.
 • भारतीय नौदलाची 14 पथके कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये 12 पथके कार्यरत आहेत.
 • या सर्व पथकांकडे मोठ्या बोटी असून अत्याधुनिक साधने आणि विशेषज्ञांचा देखील समावेश आहे. राज्य शासनाने सैन्याकडे विनंती करुन बचाव पथकाला डोनीअर विमानाद्वारे पूरग्रस्त भागात सोडण्याचे काम केले. सेनादलाचे 8 कॉलम कार्यरत असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 कॉलम तैनात आहेत. एका कॉलममध्ये 40 जवानांचा समावेश आहे.
 • पूरग्रस्त भागात जे नागरीक स्थलांतर करु इच्छित नव्हते त्यांना प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो तांदुळ आणि गहू वाटप करण्यात येत आहे.
 • सर्व पूरग्रस्त भागातील नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना 15 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरीकांना ही मदत देण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही.
 • आरोग्य विभागामार्फत 70 वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 2 ते 3 नर्स यांचा समावेश आहे.
 • पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
 • लेप्टोवरील उपायांच्या गोळ्यांचे (डॉक्सीसीन) वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. राखीव म्हणून 30 लाख गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. साथ रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
 • आपत्तीग्रस्त भागात पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 • प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर शेतीची जमीन बाधित झाली आहे. त्याची जिरायत, बागायती, फळबाग अशी फोड करण्यात येईल.
 • पाणी ओसरल्यावर पीक विम्यापोटी नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी वीमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून पिकाचे नुकसान त्याचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ मिळू शकेल. केंद्र शासनाकडे यासाठी विनंती करण्यात आली होती ती मान्य झाली आहे. पाणी कमी झाल्यावर पीक विम्याचे पंचनामे सुरु होतील.
 • पूरामुळे बाधित झालेल्या रस्त्यांचा आढावा घेतला. रस्ते वाहून जातात, खराब होतात पाणी ओसरल्यानंतर त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु होते. प्रत्येक भागात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्तीसाठी डांबर यासह आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ पोहोच करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 • ज्यावेळेस रस्त्यांवरुन वाहतूक सुरु होईल त्यावेळेस वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. जेणेकरुन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे.
 • पुरामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी टँकर्स उपलब्ध आहेत ते अधिग्रहीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
 • वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. 32 पथके कोल्हापूर येथे तर 8 पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. एका पथकात 4 लाईनमन आणि कर्मचारी उपलब्ध आहेत. पाणी कमी झाल्यावर त्यांच्यामार्फत पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
 • ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले असतील तर त्याच्या दुरुस्तीची वाट न पाहता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा. मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांना वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

0 185

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

पूरग्रस्तांची थट्टा थांबवा, जीआरमध्ये बदल करुन सरसकट सर्वांना मदत द्या !: विजय वडेट्टीवार

पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा भागाला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची भेट

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना तातडीने सर्व प्रकारची मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असताना दुसरीकडे या पूरग्रस्तांची सरकारने क्रूर थट्टा केली आहे. दोन दिवस पाण्यात बुडालेल्यांनाच सरकारी मदत देण्याचा शासन आदेश काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्तांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या भागातील परिस्थिती अजूनही भीषण आहे. सरकारी यंत्रणा तोकडी पडली असून अनेक भागातील पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचलेली नसताना सरकारने शासन आदेश काढून पूरग्रस्तांची चेष्टा केली आहे. मुळात ही मदत घरगुती नुकसान झालेल्यांसाठीच आहे. परंतु पुराच्या तडाख्यात छोटे व्यापारी, दुकानदार, यांचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच महापुरात उद्धस्थ झालेले आहे. त्यांनाही मदतीची आवश्यकता आहे. या शासन आदेशात या दुकानदारांचा व हातावर पोट असलेल्यांचा समावेश नाही. नुकसान सर्वांचेच झाले असताना मदत देताना असा भेदभाव कशासाठी, हा भेदभाव न करता सर्वांना सरसकट मदत मिळेल असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी हसतमुख सेल्फी काढणारे मंत्री गिरीश महाजन यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. सरकारचे मंत्री पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आले आहेत का पूरपर्यटनाला? असा सवाल त्यांनी विचारला आहे. मंत्र्यांना परिस्थितीचे गांभिर्य नसून हा लाजिरवाणा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने पाणी सोडले यावरही त्यांनी शंका उपस्थित केली. पाण्याचा विसर्ग झाला असता तर सांगली भागात पाणी ओसरले असते पण या भागात तर पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे पाणी सोडल्याचा दावा खोटा वाटत आहे. याप्रश्नी कर्नाटक सरकार खोटे बोलत आहे, का महाराष्ट्र सरकार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चार-पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कसलीही मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी जलदगतीने अंमलबजावणी करण्याची सध्या नितांत गरज असून त्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

0 213

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा!

मुंबई : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पूराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. लाखो लोक रस्त्यावर आले आहे पण सरकार पूरग्रस्तांना मदत करण्याबाबात गंभीर नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. सरकारनेही शासन निर्णयात बदल करून उद्धवस्त झालेल्या नागरिकांना, सर्व पूरग्रस्तांना सरसकट मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. आनंदराव पाटील त्यांच्यासोबत होते.  आ. थोरात यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात नागरिकांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण सरकार या भागातील नागरिकांना मदत करण्याबाबत गंभीर नाही. अद्याप हजारो लोक पुरामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याऐवजी सरकारचे मंत्री बोटींमधून पर्यटन करत आहेत. हे अत्यंत संतापजनक आहे. लोक उघड्यावर आले असताना सरकारचा मदतीचा शासन निर्णय हा लोकांची क्रूर थट्टा आहे. सरकारने हा शासन निर्णय तात्काळ रद्द करून सर्व पूरग्रस्तांना सरसकट मदत द्यावी असे आ. थोरात म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जनतेला कितीही त्रास झाला तरी ते आपल्यालाच मतदान करतात या मानसिकतेतून बाहेर येऊन सरकारने या संकटाकडे गंभीरपणे पहावे. काँग्रेस आमदार डॉ. विश्वजीत कदम, आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते  गेल्या चार दिवसांपासून पाण्यात उतरून लोकांची मदत करत आहेत. पण भाजपचे मंत्री, आमदार, खासदार मात्र मदतकार्यात दिसत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या संकटात काँग्रेस पक्ष पूर्णपणे लोकांच्या पाठीशी असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्य असेल ती मदत करावे असे आवाहन त्यांनी केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज स्थापना दिवसाचे कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात मदत फे-या काढल्या आहेत. या माध्यमातून जमलेली मदत पूरग्रस्तांना देण्यात येईल. सरकारनेही कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टीकोनातून या संकटकाळी तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी. या कठीण काळात केंद्र सरकारने राज्याला मदत करण्याची आवश्यकता आहे पण केंद्राने अद्याप मदत जाहीर केली नाही. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून निधी मिळवावा व पूरग्रस्तांना मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

0 180

राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर

केंद्र सरकारने तात्काळ ४ हजार कोटींची मदत द्यावी

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना आ. थोरात म्हणाले, गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यांमधील लाखो लोक पूरामुळे बेघर झाले आहेत. लाखो लोक पूराच्या पाण्यामध्ये अडकून पडले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. पण महाजनादेश यात्रेच्या जल्लोषात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पूरग्रस्तांचा व्यथा पोहोचू शकल्या नाहीत हे दुर्देव आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना चार पाच दिवस पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. या सरकारमध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच नेमले आहेत का? असा संतप्त सवाल आ. थोरात यांनी केला.

राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे. महाराष्ट्रावर एवढे मोठे संकट आले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक विजयातच मश्गुल आहेत. एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्वीट करणा-या पंतप्रधानांनी राज्यातील पूरस्थितीची अद्याप साधी दखलही घेतली नाही. आज बचावकार्य करणारी एक बोट उलटल्यामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पूर ओसरल्यावर रोगराई पसरण्याची भीती आहे त्यावेळी परिस्थिती अजून गंभीर होईल. मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी आम्ही केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन केले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. काँग्रेस पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र कोठेही दिसत नाहीत. भाजपला जनतेची गरज फक्त मतांपुरतीच आहे.  मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन सरकारने लोकांच्या जीवाची पर्वा करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

0 202

पुरात जनता होरपळत असताना पुण्यात पक्ष मेळावा घेणाऱ्या भाजप मंत्र्याची हकालपट्टी करा.

पूरबळींच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये द्या.

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्याची सर्व कर्जे माफ.

मुंबई :  राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित व वित्त हानी झालेली आहे. आतापर्यंत राज्यात १४६ लोकांचा अतिवृष्टीमुळे हकनाक जीव गेला असून सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ गावात आज मदतकार्याची बोट उलटून ३२ लोकांचा बळी गेला, याला सरकारची नियोजनशून्यता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यावरचे संकट मोठे असून त्याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे अशी मागणी केली आहे.

पूरपरिस्थीतीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला महापुराने वेढलेले आहे. या भागातील शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूर, सांगलीतील परिस्थीती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. गत चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे, याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. 

मुंबई-बंगळूरू महामार्ग मागील पाच-सहा दिवसांपासून ठप्प आहे. पुरात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचत नाही. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडलेली आहे. मुख्यमंत्री आधी प्रचार यात्रेत मश्गूल होते तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही फारसे गांभिर्याने पाहिले नाही.

कोल्हापूर, सांगली भागातील जनता पुराने त्रस्त असताना मदत व पुनवर्सन मंत्री सुभाष देशमुख हे पुण्यात पक्षाचा मेळावा घेण्यात मग्न. अशा असंवेदनशील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी ताततडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.  कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला पाच आमदार, दोन खासदार दिलेत ती शिवसेना पूरग्रस्तांना मदत पोहचवण्याकडे दुर्लक्ष करुन मातोश्रीवरही पक्षप्रवेशाचे सोहळे साजरे करत आहे हे लाजीरवाणे आहे. बाळासाहेबांची संवेदनशील मातोश्री आता राहिलेली नाही, असा प्रहारही वडेट्टीवार यांनी केला.  

पूर परिस्थिती राज्य सरकारच्या पूर्णपणे हाताबाहेर गेली असून लष्कराची मदत घेण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडले असते तर कृष्णा खोऱ्यातील हानी काही प्रमाणात कमी झाली असती पण कर्नाटकच्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्राच्या विनंतीकडे सपशेल दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता दोन्ही राज्यात भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विनंतीचा विचार करायला पाहिजे होता, येडीयुरप्पा ऐकत नसतील तर महाराष्ट्राने केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगायला पाहिजे होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.

पुरामुळे दळणवळण ठप्प झाल्याने मुंबईला होणारा दूध व भाजीपाला पुरवठ्याची टंचाई होऊ शकते याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज होती. राज्यावर आलेले हे संकट नैसर्गिक असले तरी राज्य सरकारचा निष्काळजी व बेजाबदारपणाही तेवढाच जबाबदार आहे.लोकांचे बळी जाईपर्यंत सरकारला जागच येत नाही हे आतापर्यंतच्या घटनांवरून दिसून येते. सरकारने आता पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करावीत, राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी काम करावे आणि तातडीने शेतमाल,खाजगी संपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी. तसेच  सर्वपक्षीय बैठक बोलावून करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.    

0 205

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com 

संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीरांच्या विचारानेच वाटचाल करावी लागेल

मुंबई : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत. आज संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. जातीभेद, विषमता संपवून समता प्रस्थापित करण्याची ताकद लोकशाहीरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. 

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरच्या सुमन नगर येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यानंतर अभिवादन सभेत बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचा प्रभाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची देशाला गरज आहे. अण्णाभाऊंचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. इथून पुढच्या कालखंडात त्याच विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.  राज्यघटना आणि लोकशाही टिकली पाहिजे असे जर सर्वांना वाटत असेल तर अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणा सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, विषमता संपवून समतेचे तत्व पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊंचा विचार टिकणं महत्त्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे काव्य महत्वाचे ठरले होते याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.