छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे. या रायगडाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती. या संदर्भात त्यानी सातत्त्याने पाठपुरावा केला. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभिकरणचे उदघाटन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने दसऱ्या निमित्त श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य शिवप्रेमी तरुण, तरुणी उपस्थित होते. पहाटेच्या वेळेस कार्यक्रमाची तयारी करीत असताना महाराजांना पुष्पहार अर्पण करीत असताना शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा व्हायब्रेट ( हलल्या) झाल्यासारखा वाटून आला. या कार्यक्रमला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे उपास्थित असल्याने त्यांनी सदरची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेऊन महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. तसेच अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला असलेला रंग बदलून ब्राऊन द्यावा, स्मारकाठिकाणी असलेल्या दगडांना ठेकेदारांनी कोटिंग केली नसल्याने तातडीने कोटिंग करावे, अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, स्मारकाच्या समोर असलेले एमएसईबीचे विद्युत पोल काढून विद्युत वाहिन्या भूमिगत करणेकामी प्रस्ताव तयार करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.