Home ई - पेपर्स

चंद्रपूर : देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
चंद्रपूर शहरापासून सुमारे २२ किमी अंतरावर जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र, या अंतरात सुमारे अर्धा डझन खुल्या कोळसा खाणी आहेत. इथलं १२१ हेक्टर जंगल बेचिराख करून तिथे दुर्गापूर डीप विस्तार खाणीकरता आता कोळसा उत्खनन केलं जाणार आहे. याबाबत २०१४ साली वनविभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त झाले आहेत.
आधीच इथल्या खाणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघांचे सर्वोत्तम भ्रमणमार्ग उध्वस्त झाले आहेत. यात आता दुर्गापूर डीप विस्तारानं या सर्वांवर कडी केली असून, या खाणीनं वाघोबांचं अस्तित्वच संकटात आणलं आहे, असं पर्यावरण अभ्यासक डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे या नव्या खाण क्षेत्रातील जंगलात वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, सांबर असं विपुल वन्यजीवन आणि वृक्षसंपदा अस्तित्वात आहे. तरीही ही खाण योग्य असून खाणीनं भ्रमणमार्ग तुटणार नाही असा आश्चर्यजनक निष्कर्ष, वन विभागानं नेमलेल्या तज्ज्ञ समितीनं नोंदवला आहे. वनाधिकारी मात्र यावर वनाधिकारी मात्र सारवासारव करताना दिसतायत.
चंद्रपूर जिल्ह्यात ५० कोळसा खाणी आहेत. त्या सर्व जंगलांना-गावाना उध्वस्त करून खोदल्या गेल्या आहेत. मात्र ताडोबाचा भ्रमणमार्ग शाबूत ठेवण्यासाठी वनविभाग आटोकाट प्रयत्न करत असल्याचं आजवरचे चित्रं होतं. मात्र तेही फसवं असल्याचं दुर्गापूर डीपला दिलेल्या परवानगीनं सिध्द झालं आहे.

नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांसाठी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (सीपीआय) अतुल कुमार अंजन यांनी सनी लिऑनला जबाबदार धरले आहे.
सनी लिऑनच्या कंडोमच्या जाहीरातीमुळे देशात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. सनी लिऑन नावाची एक महिला आहे तिने अनेक पॉर्न चित्रपटात काम केले आहे. तिची आता एक कंडोमची जाहीरात प्रक्षेपित होते. ही जाहीरात टी.व्ही, वर्तमानपत्रासह इतरत्र दाखवली जात असले तर, देशात बलात्काराच्या घटना वाढतील असे अंजन म्हणाले.
अशा जाहीरातींमुळे संवेदनशीलता संपून उत्तेजना वाढते असे अतुल कुमार अंजन म्हणाले. ते उत्तरप्रदेशमधील गाझीपूर येथील एका सभेमध्ये बोलत होते.
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणार्‍या सनीला लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही डोंबिवली पोलिस स्थानकात तिच्या विरोधात अश्लीलता पसरवत असल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता.
बॉलिवूडमध्ये सनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी, तिला अजून स्वत:वरील पॉर्नस्टारचा शिक्का पुसता आलेला नाही तसेच राजकीय नेत्यांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांनी काही दिवसांपूर्वी बलात्कारासंदर्भात अशाच प्रकारचे वादग्रस्त विधान केले होते.

मुंबई : नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी देशातील दहा प्रमुख बड्या कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये या संपाचा परिणाम दिसून आलेला नसला तरी, अन्य राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे नागरीकांना या संपाची झळ बसली आहे.
बँक कर्मचारी या संपात मोठ्या संख्येने उतरल्याने देशातील प्रमुख बँकांमधील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील २५ बँका, ११ खासगी बँका आणि नऊ परदेशी बँकांमधील मिळून १३ लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
नरेंद्र मोदी सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्यातील सुधारणा कामगार विरोधी आहेत. या सुधारणा रद्द कराव्यात, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक बंद करावी, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे आणि कामगारांचे किमान वेतन १६ हजार करावे या बारा मागण्यांसाठी कामगार संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे.
*** बेंगळुरू
बीएमटीसीच्या बसेस, १५ व्हॉल्व्हो बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्याने बंगळुरूमध्ये परिवहन सेवा बंद करण्यात आली आहे. म्हैसूर रस्त्यावरही दगडफेक झाल्याचे वृ्त्त आहे.
** दिल्ली
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांनी संप मोडून गाड्या रस्त्यावर आणल्या त्यांच्या गाडयांच्या काचा फोडण्यात आल्या.
** पश्चिम बंगाल
कर्मचारी संघटनांचा प्रभाव असलेल्या पश्चिम बंगालमध्ये संपाचा परिणाम दिसून येत आहे. दुकाने, बाजार आणि व्यावसायिक आस्थापने बंद आहेत.
डाव्यांचा संपाला पाठिंबा आहे तर, सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे काही ठिकाणी तृणमुल आणि डाव्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आंदोलकांनी रेल रोको करण्याचाही प्रयत्न केला.
** केरळ
केरळमध्येही या बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून बँका, दुकाने बंद आहेत. कोचीन बंदरातील व्यवहारही ठप्प असून, आयटी कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांची तुरळक उपस्थिती आहे. बंदमुळे विविध विद्यापीठांनी बुधवारी होणार्‍या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

मुंबई : एस्सेल व्हिजन सर्वांसाठी प्रसिद्ध संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या रूपात घेऊन येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक शंकर महादेवन पंडित जितेंद्र अभिषेकींनी अजरामर केलेल्या पंडितजींच्या भूमिकेत आहेत.
नुकतंच चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय. ‘सूर निरागस हो’ या गाण्यात शंकर महादेवन म्हणजेच पंडितजी गणपती बाप्पाची आराधना करत आहेत.
हे गाणं यूट्यूबवर चांगलंच हिट होतंय. अवघं बॉलिवूड या गाण्याच्या प्रेमात पडलं असून खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही हे गाणं आपल्या ट्विटरवरून शेअर केलंय.

नवी दिल्ली : भरपूर मसाला असलेली मालिका बिग बॉस ९ पुन्हा येत आहे, यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि अनोख्या चेहर्‍यांना सहभागाचं निमंत्रण दिलं जात आहे, याची यादी लिक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे
** श्‍वेेता बसू प्रसाद : ‘मकडी’ सिनेमात तुम्ही पाहिलेली बालकलाकार श्वेता बसू प्रसाद, त्यानंतर ’कहानी घर घर की’ मधून घराघरात पोहोचली, यानंतर तिने सर्वांच्या आठवणीत राहणारा सिनेमा इक्बालमध्ये महत्वाची भूमिका केली. यानंतर एका सेक्स रॅकेटमध्ये देखील श्वेता बसू प्रसादचं नाव चर्चेत आलं.
** राहुल यादव : हाऊसिंग डॉट कॉमचा माजी सीईओ राहुल यादव, ज्याला नोकरी सोडल्यानंतर घरही सोडावं लागलं होतं, ज्याने वेबविश्वाच्या जगात काल्पनिक वादळ निर्माण केलं होतं.
** व्हीजे बानी : रोडीज सिझन ४ जिंकणारी व्हीजे बानी, बिग बॉसच्या घरात येणार असल्याने मोठी टक्कर स्पर्धकांना असणार आहे.
** आशा नेगी : टीव्ही जगतातला एक चेहरा, जो पवित्र रिश्ता मालिकेतून सर्वांपर्यंत पोहोचला, आशा नेगी ’इंडियन आयडॉल ज्यूनियर’वर झळकतेय.
** रश्मी देसाई : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई ही नच बलिए या रियालिटी डान्स शोमधून नावारूपाला आली आहे
** राधे मॉं : राधे मॉं सध्या जोरदार चर्चेत आहे, स्वयंघोषित धर्मगुरू राधे मॉं सध्या चर्चेत आहे. मिनी स्कर्ट आणि लोकप्रिय सत्संगमुळे राधे मॉं चर्चेत आली आहे.

बिगबॉस ९ च्या सिझनमध्ये वरील सेलिब्रिटींचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : प्राप्तिकर भरण्याचा सोमवार (ता. 31) शेवटचा दिवस असून ई-रिटर्न‘ दाखल करणे सुलभ होण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडून विवरणपत्रांचे (आयटीआर-व्ही) ई-व्हेरीफिकेशन‘ केले जाईल. या सेवेमुळे पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या करदात्यांच्या मोठ्या गटाला फायदा होईल, वेळेची बचत होईल आणि परतावाही जलद मिळेल.
‘डिजिटल सिग्नेचर’अभावी गेल्या वर्षापर्यंत करदात्यांना विवरणपत्राची एक प्रत स्वाक्षरीसह बेंगळूरुच्या मध्यवर्ती केंद्राकडे पाठवणे बंधनकारक होते. कित्येकदा हे पत्र प्राप्तिकर खात्याला मिळायचे नाही. त्याचा मनस्ताप करदात्यांना सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून यंदा आयटीआर-व्ही‘च्या ई-पडताळणीची सुविधा प्राप्तिकर खात्याने दिली आहे. ई-रिटर्न‘ दाखल केल्यानंतर ई-व्हेरीफिकेशन‘चा पर्याय निवडता येईल. आतापर्यंत 12 लाख करदात्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. या सेवेचा अनिवासी भारतीय करदात्यांना लाभ होईल.
** सुलभ पर्याय
* ईव्हीसी : ई-रिटर्न‘ दाखल करताना आधार, नेट बँकिंग, ई-मेल आणि मोबाईल अशा माध्यमांतून 10 आकडी ईव्हीसी (अल्फा न्युमेरिक ई-व्हेरीफिकेशन कोड) निर्माण करता येईल. प्रत्येक पॅन‘साठी स्वतंत्र ईव्हीसी असेल. हा कोड एका रिटर्न‘साठीच वापरता येतो. त्यामुळे दुसरे विवरणपत्र दाखल करायचे असल्यास पुन्हा कोड निर्माण करावा लागेल.
* आधार : करदात्याला आधार कार्डवर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक ई-रिटर्न‘मध्ये द्यावा लागेल. त्यासाठी आयटीआर-व्ही‘मध्ये रकाना दिला आहे. आधार कार्ड प्राप्तिकर खात्याशी संलग्न झाल्यानंतर काही मिनिटांतच मोबाईलवर वन टाइम पासवर्ड‘ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड दिल्यावर आयटीआर-व्ही‘ स्वीकारले जाईल. या प्रक्रियेला 10 मिनिटे लागतात.
* नेट बँकिंग : पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न किंवा करपरतावा असणार्‍या करदात्यांना केवळ नेट बँकिंगच्या माध्यमातून ईव्हीसी‘ निर्माण करावा लागेल. बहुतांश बँका ही सेवा देतात. मोबाईलवर ईव्हीसी‘ पाठवला जातो.
* एटीएम : काही बँकांनी एटीएम मशीनमध्ये ईव्हीसी‘ निर्माण करण्याची सुविधा दिली आहे. करदात्यांना डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करून ईव्हीसी‘ निर्माण करता येईल.

मुंबई : माणूस प्रेमात पडला की काहीही सोडण्यास तयार असतो, याचा प्रयत्य अभिनेता रणबीर कपूरबाबत सध्या पाहायला मिळत आहे. प्रेयसी कॅटरिना कैफच्या आग्रहाखातर रणबीरने सिगारेटपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ऑस्ट्रेलियातील एका व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन सिगारेट सोडण्याचे उपचार घेतले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रणबीरला सिगारेट ओढण्याची सवय आहे. रणबीर आणि कॅटरिना यांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यापासून कॅटला ही बाब अतिशय खटकत होती. त्यामुळे तिने त्याला अनेकदा सिगारेट ओढू नको, असे सांगितले होते. मात्र, काही केल्या तो ऐकत नव्हता. काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूरने त्याच्या वाढदिवसानिमित्त घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी त्याचे अनेक मित्र उपस्थित होते. तेव्हा कॅटने त्याला ’मला आजच्या दिवशी केवळ एकच वचन पाहिजे ते म्हणजे सिगारेट सोडण्याचे,’ अशी मागणी त्याच्याकडे केली. त्यावर रणबीरला काहीही सुचले नाही. त्याने वचन न देता वेळ मारून नेली. मात्र, कॅटने जणू त्याची सिगारेट सोडण्याचा चंगच बांधला. आणि त्यादृष्टीने त्याचे मन वळवण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी कॅट त्याला ऑस्ट्रेलियातील एका व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेली होती. त्यानंतर रणबीर केंद्रात चार दिवस मुक्कामी होता. सिगारेट सुटल्याची खात्री पटल्यानंतरच तो केंद्रातून बाहेर पडला. अखेर कॅटरिनाने आपल्या भावी पतीची सिगोरट ओढणे बंद करून दाखवले, अशी चर्चा बॉलीवूडच्या वर्तुळात आहे.

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१४-२०१५ साठी प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१५ ही शेवटची अंतिम मुदत आहे. ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींनी लेखापरीक्षण (ऑडिट) करणे बंधनकारक आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.

*** इन्कम टॅक्सचा इतिहास
सर जेम्स विल्सन यांनी २४ जुलै १८६० रोजी भारतामध्ये प्राप्तिकराची कल्पना मांडली. सुरुवातीला हा कर केवळ निवडक श्रीमंत व्यक्तींवर लादण्यात येत होता. मात्र त्यामुळे श्रीमंतांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळे तो कायदा अवघ्या पाच वर्षांत १८६५ साली बंद झाला आणि १८६७ ला नवा कायदा तयार करण्यात आला. त्या कायद्यांतर्गत उत्पन्नाच्या मर्यादेनुसार कराची टक्केवारी ठरविण्यात आली.

*** इन्कम भरण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
* ऑडिट करून विवरणपत्र भरणार्‍या व्यक्ती किंवा संस्थांना रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.
* ज्यांचे करपात्र उत्पन्न एक कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना ऑडिट करण्याची गरज नाही.
* नोकरी करणार्‍या व्यक्तींनी रिटर्न सोबत फॉर्म नं. १६ देणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीला फॉर्म नं. १६‘ हा तो व्यक्ती काम करत असलेल्या संस्थेने, कंपनीने देणे बंधनकारक आहे.
* काही संस्थांमध्ये कर्मचार्‍यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार त्याच्या मासिक वेतनातून कर (टीडीएस) कापण्यात येतो. मात्र वर्षअखेर आगाऊ भरलेला कर अतिरिक्त झाल्यास प्राप्तिकर विभागाकडून तो परत मिळतो. अशा प्रकरणात प्राप्तिकर विवरणात करदात्याकडे असलेला प्राप्तिकर हा उणे (-) रकमेत दर्शविण्यात येतो. नंतर ही उणे रक्कम प्राप्तिकर विभागाकडून करदात्याला परत केली जाते. हीच बाब व्यापारी, उद्योजकांना, संस्था आणि कंपन्यांनाही लागू आहे.

*** प्राप्तीकर विवारांपात्रासोबत जोडावी लागणारी आवश्यक कागदपत्रे
* बँकेचे स्टेट्मेंट: तुम्हाला वर्षभरात बँकेकडून किती व्याज मिळाले यासाठी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतचे (एक आर्थिक वर्ष) बँकेचे स्टेट्मेंट देणे आवश्यक आहे. तुमच्या बँकेतून तुम्हाला असे स्टेटमेंट मिळेल. वर्षभरात आपल्याला किती व्याज मिळाले याची माहिती विवरणपत्र भरताना देणे आवश्यक आहे.
* कर्जाची कागदपत्रे: तुम्ही वर्षभरात विविध प्रकारची गुंतवणूक करतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या काही गुंतवणुकीमुळे तुम्हाला प्राप्तिकरातून सूट मिळू शकते. जसे तुम्ही पीपीएफमध्ये भरलेली रक्कम, विम्याचा हप्ता, मुलामुलींची भरलेली फीच्या पावत्या इ. शिवाय तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा आणखी काही कर्जाचे स्टेटमेंट विवरणपत्र भरताना देणे आवश्यक आहे.
* इतर महत्त्वाची कागदपत्रे: विवरणपत्र भरण्यासाठी इतर काही महत्त्वाची कागदपत्र देणे आवश्यक आहे. त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा अकाउंट नंबर, बँक शाखा, बँकेचा आयएएफसी कोड इ. बँकेच्या अकाउंट नंबरमुळे प्राप्तिकर विभागाकडून येणारा रिफंड त्यात जमा होतो.

डर्बन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर असलेला वेगाने आठ हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलियर्सने मोडीत काढला.
डरबनमध्ये बुधवारी न्यूझीलंड विरुध्दच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने हा विक्रम मोडला. डिव्हिलियर्सने १८२ डावांमध्ये आठ हजार धावांचा टप्पा पार केला. गांगुलीने २०० डावांमध्ये आठ हजार धावांचा टप्पा गाठला होता. गांगुलीपेक्षा १८ आणि सचिनपेक्षा २८ डाव आधी डिव्हिलियर्सने या विक्रमाला गवसणी घातली.
एकदिवसीय सामन्यांमध्ये वेगवान अर्धशतक, वेगवान शतक आणि वेगवान १५० धावांचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने सनथ जयसूर्याचा १९ वर्षापूर्वीचा कमी चेंडूत अर्धशतक झळकवण्याचा विक्रम मोडला होता.
डिव्हिलियर्सने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. १९९६ मध्ये जयसूर्याने पाकिस्तान विरुध्द १७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याच सामन्यात डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत जलद शतक झळकवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
यापूर्वी ३६ चेंडूत जलद शतक झळकवण्याचा विक्रम कोरे अँण्डरसनच्या नावावर होता. याच सामन्यात डिव्हिलियर्सने रोहित शर्माच्या १६ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. ऑस्ट्रेलिया विरुध्द २०१३ मध्ये रोहितने १६ षटकार ठोकले होते.