अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांना सामाजिक घडामोडींचेही ज्ञान असावे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. असाच एक अभिनव उपक्रम २८ एप्रिल रोजी सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या सर्व २३ माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात आला.
नागरिकांना आवश्यक असलेल्या नवी मुंबई महापालिकेशी संबंधित लोकसेवा विहित कालावधीत, सुलभ रितीने उपलब्ध व्हाव्यात याकरिता महापालिका सातत्यपूर्ण प्रयत्नशील असून ६८ लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यायोगे नागरिक आपल्या मोबाईलवर महापालिकेची www.nmmc.gov.in ही ‘वेबसाईट’ उघडून अथवा ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ या ॲपवरून एका क्लिकवर या लोकसेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. याबाबतची माहिती महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळावी तसेच त्यांच्या माध्यमातून पालकांना व संपर्कातील नागरिकांनाही मिळावी या दृष्टीने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शाळांतील शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
याशिवाय इयत्ता नववीमधील ३५०९ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी तसेच सामाजिक जीवनात आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या दाखल्यांची माहिती, जसे की – उत्पन्न दाखला, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर/ कमी उत्पन्न गटाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट इत्यादींची सविस्तर माहिती देण्यात आली. ही प्रमाणपत्रे मिळण्याचे ठिकाण, प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी, प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे शुल्क, प्रमाणपत्र देणारे अधिकारी, अपिलीय अधिकारी इत्यादी विस्तृत माहिती देण्यात आली.
या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात होणार आहे. अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या २३ माध्यमिक शाळांमध्ये लोकसेवांविषयीची माहिती देत ‘सेवा हक्क दिन’ माहितीपूर्ण रितीने उत्साहात साजरा करण्यात आला.