अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘वेव्हज् २०२५’ अंतर्गत ‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सांगीतिक कार्यक्रमानंतर डॉ. डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम
रस्त्यावरून २ टन व स्टेडियम परिसरातून ५.५ टन कचरा संकलन रात्रीच राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सकाळी रस्ते स्वच्छ दिसले आणि नागरिकांनी व्यक्त केले समाधान
स्वच्छ शहर ही नवी मुंबईची देशभरात ओळख असून त्यादृष्टीने डी. वाय. पाटील स्टेडियम येथे ‘वेव्हज् २०२५’ अंतर्गत संपन्न झालेल्या जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांच्या ‘वंडरमेट’ या वैश्विक प्रीमियर लाईव्ह संगीतमय कार्यक्रमाप्रसंगी हजारो दर्शक उपस्थित होते. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमानंतरच्या स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छतेचे पूर्वनियोजन केले होते.
त्यास अनुसरून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ एक उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांनी याकडे विशेष लक्ष देत या परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम राबविली.
या मोहिमेमध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्यासह ४ स्वच्छता निरीक्षक, ३ स्वच्छता पर्यवेक्षक व ५४ स्वच्छतामित्रांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे त्यांनी संकलित केलेला कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यासाठी ३ टाटा एस कचरा वाहतूक वाहने कार्यरत होती. त्यावर कचरा वाहतूक व्यवस्थापक आणि ९ स्वच्छताकर्मींनी लगेचच कचरा वाहून नेला.
स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसरातून २ टन कचरा संकलित करून उचलण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण अधिक होते. त्याचप्रमाणे डॉ. डी वाय पाटील स्टेडियमच्या आतील भागात १० टन क्षमतेचे लार्जर कॉम्पॅक्टर वाहन उभे करण्यात आले होते. त्यामध्येही ५.५ टन कचरा संकलित करण्यात आला. तो देखील भरून प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच पूर्वनियोजन करून रात्रीच राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सकाळी स्वच्छ रस्ते पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.