जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण बारावीचा निकाल सोमवारी म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकताच ही घोषणा केली. सोमवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
५ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निकालाची तारीख कधीही जाहीर केली जाऊ शकते असे देखील सांगितले जात होते. त्यानुसार आज बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केली.
निकाल कुठे पाहाल –
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
कसा चेक कराल निकाल?
– विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
– क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
– हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.