अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
धरमशाळा : पंजाब किंग्सने धरमशालाच्या घरच्या मैदानावर लखनौचा धावांनी मोठा पराभव केला आहे. पंजाबने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलंय. तर लखनौ संघाला आता प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर रस्ता खूप अवघड असणार आहे. पण पंजाबविरूद्ध आयुष बदोनीने लखनौकडून एकट्याने कमालीच्या धावा केल्या.
पंजाब किंग्सने दिलेल्या २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात खूप खराब झाली. अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स घेत लखनौच्या मुख्य ३ फलंदाजांना माघारी धाडलं आणि लखनौच्या धावांना ब्रेक लावला. मिचेल मार्श आणि ए़डन मारक्रम तिसऱ्या षटकात बाद झाले तर निकोलस पुरन पाचव्या षटकात बाद झाला. हे तिन्ही विकेट अर्शदीपने घेतले. ऋषभ पंतने यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो १८ धावा करत बाद झाला, तर डेव्हिड मिलर ११ धावा करत बाद झाला. यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी संघासाठी भागीदारी रचली. अब्दुल समद २४ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा करत बाद झाला. तर आयुष बदोनीने वादळी खेळी करत लखनौचा डाव सांभाळला. बदोनीने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. तर आवेश खान १० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३ विकेट्स, अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतले. मार्कोयान्सन व चहलने १-१ विकेट घेतली.
लखनौने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबच्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करत २० षटकांत २३६ धावांचा टप्पा गाठला. प्रियांश आर्य पहिल्याच षटकात बाद झाला. पण प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. तर जोश इंग्लिस १४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३० धावा करत बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंग ४८ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ९१ धावा करत बाद झाला. अवघ्या काही धावांनी त्याचं शतक हुकलं.
श्रेयस अय्यरने २५ चेंडूत २४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. तर नेहाल वधेरा १६ धावा करत बाद झाला. शशांक सिंगने विस्फोटक फलंदाजी करत १५ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारांसह ३३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात योगदान दिलं. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठीने २-२ विकेट्स घेतले. तर प्रिन्स यादवने १ विकेट घेतली.