अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने रविवारी अत्यंत अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. या विजयामुळे कोलकाताच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकाताने दिलेल्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान कर्णधार रियान पराग यांची झंझावती ९५ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने सलग ६ चेंडूत सहा षटकारही पटकावले. मात्र अखेर संघ २० षटकांत ८ बाद २०५ धावापर्यंतच मजल मारु शकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ७१ धावांवर पाच विकेट गमावल्या. यानंतर, रियान परागने शिमरॉन हेटमायरसोबत सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची निर्णायाक भागीदारी केली. संघाने विजयाकडे वाटचाल सुरु केली. रायनने मोईन अलीच्या षटकात सलग पाच षटकार मारले. २९ धावा काढून बाद झालेल्या हेटमायरला बाद करून हर्षित राणाने ही भागीदारी मोडली. यानंतर काही वेळातच हर्षितने रायनलाही आपला बळी बनवले. रायनला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही आणि तो ९५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. शुभम दुबे आणि जोफ्रा आर्चर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून क्रीजवर होते. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वैभव अरोराकडे चेंडू सोपवला. आर्चरने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. स्ट्राईकवर आलेल्या शुभमने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर षटकार मारला. राजस्थानला एका चेंडूवर तीन धावांची आवश्यकता होती. वैभवच्या चेंडूवर शुभमने एक धाव घेतली तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला; पण रिंकू सिंगने केलेल्या थ्रोवर तो धावबाद झाला. अशाप्रकारे कोलकाताने अवघया एका धावेने रोमांचक विजय मिळवला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने ३४ धावा केल्या, तर शुभम दुबेने १४ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह २५ धावा केल्या आणि नाबाद राहिला. आर्चर १२ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, वैभव सूर्यवंशीने चार धावा केल्या आणि कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. केकेआरकडून मोईन, हर्षित आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर वैभवला एक विकेट मिळाली.
आयपीएल २०२५ मधील आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाला १३ धावांवर पहिला धक्का बसला. सुनील नारायणने नऊ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्या. युधवीर सिंगने सुनील नारायणला बाद केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. गुरबाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण महेश टिक्षणाने त्याला बाद करून ही भागीदारी मोडली. गुरबाज २५ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा काढून बाद झाला. आंद्रे रसेलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या षटकात रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या मदतीने कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्ससमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. रसेलने २५ चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या, तर रिंकूने सहा चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे केकेआरने २० षटकांत चार गडी गमावून २०६ धावा केल्या.
रहाणेने डाव नियंत्रणात ठेवला आणि त्याला अंगकृष रघुवंशीने चांगली साथ दिली. रहाणेला ४४ धावा काढल्यानंतर रियान परागने बाद केले. यानंतर रसेलने स्फोटक फलंदाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांना लक्ष्य करताना तो जुन्या फॉर्ममध्ये दिसला. रसेलने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे. आकाश माधवालने शेवटच्या षटकात पहिले तीन चेंडू वाईड टाकले. यानंतर रिंकूने स्फोटक फलंदाजी करत एक चौकार आणि दोन षटकार मारले आणि संघाचा धावसंख्या २०० पार नेली.