नवी मुंबई : अनधिकृत होर्डींगच्या बकालपणातून महापालिका उद्यानासह नेरूळ सेक्टर सहा परिसराची मुक्तता करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बॅनर व फलक लागत असतानाही महापालिका प्रशासनाचा विभाग कारवाई करत नसल्याने या परिसराला बकालपणा आला आहे. याच परिसरात महापालिकेचे नेरूळ सिव्ह्यू उद्यान आहे. या उद्यानात महापालिकेने मोठे लोखंडी होर्डींग स्टॅड उभारलेले आहे. या स्टॅंडवर केवळ महापालिका प्रशासन जनजागृतीपर असल्याचा त्यावर स्पष्ट उल्लेख आहे. त्यावर कोणी बॅनर लावल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यावर स्पष्टपणे नमूद केलेले असल्याने खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
आजही आपण परिसरात फेरफटका मारल्यास नेरूळ सेक्टर सहामधील समाजमंदिर चौकात आपणास फलक लागलेले पहावयास मिळतील. या फलकावर कोठेही महापालिकेची पावती नाही. नेरूळ सिव्ह्यू या पालिका उद्यानातील लोखंडी होर्डींग स्टॅडवर नेहमीप्रमाणे जाहिरातीचे बॅनर लागलेले आहे. अनधिकृत होर्डींग, बॅनरमुळे महापालिकेच्या उत्पन्नात तर घट येतेच, परंतु परिसराला बकालपणाही प्राप्त होत आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग नेरूळ सेक्टर सहा परिसरात कार्यरत नसल्याने उद्यानातील होर्डींगवर, पथदिव्यांवर, चौकाचौकात आपणास बाराही महिने होर्डींग व बॅनर विनापरवाना लागलेले पहावयास मिळतील. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजवर अनधिकृत बॅनर, होर्डींगप्रकरणी किती जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, याची विचारणा केल्यास अतिक्रमण विभागाचा कार्यक्षमपणा आपल्याला दिसून येईल. आपण संबंधितांना नेरूळ सेक्टर सहा परिसरातील पथदिवे, उद्यानातील होर्डींग स्टॅण्डवरील बॅनर तातडीने हटवावेत व पथदिव्यांवर, उद्यानातील होर्डींग स्टॅण्डवर, चौकाचौकात विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे तातडीने दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.