स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन २०२५ हा ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेंतर्गत साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका पर्यावरण सप्ताह साजरा करीत विविध पर्यावरण विषयक उपक्रम राबवित आहे.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रविवारी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ अंतर्गत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या प्रत्यक्ष सहभागातून ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
यामध्ये बेलापूरचे स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक तसेच लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समीत आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे नेरूळच्या एसआयएस महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींही या मोहीमेत उत्साहाने सहभाग घेतला.
पारसिक रस्ता आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील प्लास्टिकच्या व काचेच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, रॅपर्स, प्लास्टिक व कागदाचे तुकडे या मोहीमेत एकत्रित करण्यात आले. या विशेष स्वच्छता मोहिमेत २६ गोणी कचरा गोळा करण्यात आला. यापुढील काळात जागतिक पर्यावरण सप्ताहामध्ये अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहिमा तसेच वृक्षारोपण व इतर पर्यावरण विषयक उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
000000000000000000
नवी मुंबई लाईव्ह वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी Navimumbailive.com@gmail.com
या मेल आयडीवर मेल करावे अथवा ८३६९९२४६४६ या क्रमाकांवर मजकुर व फोटो व्हॉटसअप करण्यात यावे.