नवी मुंबई : जुईनगर सेक्टर 23 मधील महापालिकेच्या शाहीर कृष्णा पाटील उद्यानात वृक्षछाटणी अभियान तातडीने राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर आणि काँग्रेसचे जिल्हा सचिव महानंद रामराजे यांनी संयुक्तपणे एका निवेदनातून महापालिका आयुक्त व महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जुईनगर सेक्टर 23 परिसरात महापालिकेचे शाहीर कृष्णा पाटील उद्यान आहे. या उद्यानातील वृक्षाच्या फांद्या उद्यानालगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पसरल्या आहेत. लगतच्या सुखसागर सोसायटीच्या अंर्तगत भागातही फांद्या आल्या आहेत. उद्यानालगतच्या पदपथावर फांद्या आल्या आहेत. सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. नंतर पावसाळी हंगाम सुरु होईल. सोसायटी आवारात फांद्यांची पडझड झाल्यास लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक जखमी होण्याची भीती आहे. पालिका उद्यानातील फांद्यांची वेळीच वृक्षछाटणी होणे आवश्यक आहे. आपण या उद्यानातील अस्ताव्यस्त वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे संबंधितांना निर्देश देवून सभोवतालच्या सोसायटीतील रहिवाशांना व परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर आणि काँग्रेसचे जिल्हा सचिव महानंद रामराजे यांनी केली आहे.