नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील पावसाळी पूर्व कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. सध्या अवकाळी पावसाने नवी मुंबईला झोडपले असून नियमित पावसाला आता १५ दिवसांमध्ये सुरुवात होईल. पावसाळा तोंडावर आला असल्याने लवकरात लवकर कामे होणे अपेक्षित आहे.
पावसाळा तोंडावर आला असून प्रभागात कोठेही वृक्षछाटणी अभियान राबविण्यास सुरुवात झालेली नाही. पावसापूर्वी जोरदार वारे वाहिल्यास ठिसूळ झाडे, फांद्या पडण्याची शक्यता असून त्यामुळे जिवित व वित्त हानी होण्याची भीती आहे. नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ मध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने प्रभागात वृक्षछाटणी अभियान राबवून स्थानिकांना दिलासा द्यावा. महापालिका प्रशासनाने पावसाळीपूर्व कामे करताना प्रभाग ९६ मधील अंर्तगत व बाह्य भागातील गटारांची सफाई सुरु केली आहे. त्यातील कचरा, माती व अन्य साहित्य काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु गटारातून काढण्यात आलेली माती व अन्य कचरा प्रशासनाकडून तातडीने उचलला जात नाही. अवकाळी पावसामुळे गटारातून काढलेली माती, गाळ व अन्य कचरा पुन्हा गटारामध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे. उन्हामध्ये त्या मातीतून, कचऱ्यातून दुर्गंधी येत असते. त्या दुर्गंधीचा स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने संबंधितांना गटारातून काढलेली माती, गाळ व अन्य कचरा तातडीने तेथून हटविण्याचे निर्देश द्यावेत. प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ परिसरातील स्थानिक रहिवाशांनी डासांच्या त्रासांनी त्रस्त झाले असून नागरिकांना मलेरिया आजारांची लागणही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. राज्यात डेंग्यू पुन्हा डोके वर काढत असताना मलेरियाची भीती वाढत आहे. पावसाळा आल्यावर महापालिका फवारणी करत नाही. त्यामुळे डासांचा त्रास संपुष्ठात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने परिसरातील अंर्तगत व बाह्य भागात तसेच सोसायटींच्या अंर्तगत भागातही धूर फवारणी अभियान तातडीने राबवण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे. नेरूळ भाजपाचे नेते गणेश भगत यांनी स्वत: महापालिका विभाग अधिकाऱ्यांची भेट घेत प्रभागातील समस्यांची त्यांना माहिती दिली.