स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मानवतावादी दृष्टीकोन ठेवून महापालिका शाळेमध्ये काम करणाऱ्या घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमिक शाळांना २०२३ साली शिक्षकांची कमतरता भासल्यानंतर पालिकेचे तत्कालिन आयुक्त यांनी शिक्षकांची जाहिरात देऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षकांची नवीन भरती केली. या शिक्षकांना महानगरपालिकेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. सदर शिक्षकांनी सलग दोन वर्ष महापालिका शाळेमध्ये सेवा केलेली आहे. या कालावधीत वाढत्या महागाईच्या काळात कमी वेतनामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. शासकीय सुट्टी, साप्ताहिक सूटटी अशा छोट्या आणि गणपती सूटटी, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या सर्व सुट्टयांमध्ये सदर शिक्षकांनी विनावेतन आपल्या कुटुंबाला व गरीब आई-वडीलांना मुंबईसारख्या शहरात सांभाळायचे काम केले आहे. या शिक्षकांना महापालिकेने दिवाळीसाठीचा सानूग्रह अनुदान ही दिलेले नाही. बेरोजगारीचे भयंकर वास्तव सद्य:स्थितीत सर्वत्र आहे. अशा अवस्थेत स्वत:च्या गरीब आई वडील व कुटुंबांना सांभाळण्यासाठी सदर जाहिरातीने भरलेले गुणवत्ताधारक शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी पुनर्नियुक्ती देण्यासाठी महापालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला शिक्षकांची गरज आहे. या शिक्षकांना महापालिकेत शाळेत शिकविण्याचा अनुभव आहे. महापालिकेने मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.