जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमाच्या घणसोली डेपोत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा अन्यायकारकरित्या खंडित करण्यात आल्याने त्यांना तातडीने सेवेत घेण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका परिवहन विभागाच्या घणसोली डेपोत महालक्ष्मी या कंपनीत काही कामगार सफाईचे काम करत होते. त्यांना महालक्ष्मी कंपनीच्या व्यवस्थापणाने कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही नोटीस न देता अचानक त्यांना काम बंद करण्यास सांगितले आहे. महापालिका प्रशासनाने या कंपनीला टर्मिनेट केले आहे. या कामगारांना गेल्या महिन्याचा पगारही आजतागायत भेटलेला नाही. असे असताना कंपनीने त्यांची सेवा अचानक खंडीत केली असून त्यांना कामावर न येण्यास बजावले आहे. सध्या डेपोत सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या सफाई कामगारांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे प्रशासनात सेवा केलेली आहे. पालिकेत काम करणारे कर्मचारी हे पालिकेचे आहेत. ठेकेदार, कंत्राटदार बदलला तरी या कामगारांची सेवा कायम असते. त्यांना कोणीही नोकरीवरुन काढत नाही. महापालिकेचे तसे धोरण आहे. अवघ्या १२ हजार रुपयांवर हे कर्मचारी या महागाईच्या काळात काम करत आहेत. या कामगारांचा पीएफही कापला जात नाही. ठेकेदारांकडून आजवर या कामगारांचे शोषण केले आहे. कामगारांना सेवामुक्त केल्याच्या कृत्याचा महापालिका प्रशासनाने कंपनीला जाब विचारावा. नियमाप्रमाणे कामगारांना पगार स्लिप, पगार, पीएफ, मेडिक्लेम हे दिलाच पाहिजे. आजवर कामगारांचे शोषणच केले असल्याने त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आपण संबंधित कंपनीला व प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.