भारतीय लष्कराच्या कारवाईचे आरपीआय आठवले गटाकडून समर्थंन
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पहलगाम येथील पर्यंटकावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ने चोख प्रत्युत्तर दिले असून आम्ही या ‘ऑरेशन सिंदूर’ मिशनचे स्वागत करत असून प्रत्येक भारतीय सैनिकांच्या मागे ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रिया आरपीआय आठवले गटाचे नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी पटेल यांनी व्यक्त केली आहे.
आरपीआयचे (आठवले गट) नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष व महापालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य धरमशी पटेल यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानातील आतंकवादी अड्ड्यांवर केलेल्या तडाखेबंद हल्ल्याचे जोरदार समर्थन केले आहे. या हल्ल्याला त्यांनी काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांवर झालेला गोळीबार, गोळीबारापूर्वी धार्मिक विचारणा तसेच जम्मू-काश्मिरमधील पर्यटन व्यवसायाला धोका निर्माण करु पाहणाऱ्या षडयंत्राला भारतीय सैन्याचे चोख उत्तर दिले असल्याचे धरमशी पटेल यांनी म्हटले आहे.
भारतीय सेनेने नुकताच पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर केलेला मिसाईल हल्ला हा भारतीयांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यांच्या मते, काश्मीरमध्ये धर्म विचारून भारतीय नागरिकांची केलेली हत्या हा दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा आहे, ज्याचा बदला या हल्ल्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
धरमशी पटेल म्हणाले की, आम्ही शांततेचे समर्थंक जरी असलो तरी आमच्या देशाच्या सुरक्षिततेशी कुणी खेळ करू शकत नाही. असल्या भ्याड कृत्याने भारतीय कधी भयभीत होणार नाहीत. या हल्ल्याने आतंकवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की भारत आता शांत बसणार नाही.
या हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचे विशेष कौतुक करताना, पटेल यांनी असेही नमूद केले की, मोदी सरकारने दाखवलेली ही कठोर भूमिका प्रत्येक भारतीयाच्या मनात आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करते. या मिशनमधून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असून पाकिस्तानची आगळीक, कुरापती यापुढे सहन केल्या जाणार नसल्याचे भारतीय सैनिकांनी कृतीतून दाखवून दिले असल्याचे धरमशी पटेल यावेळी म्हणाले.