जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पुणे : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तसेच, दुपारी १ वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (६ मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
यंदाही मुलींची बाजी, मुलांचा निकाल ५.०७ टक्यांनी कमी
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ८९.५१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा निकालाचा टक्का घसरला
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का १.४९ ने घसरला आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण : ९६.७४ टक्के
- पुणे : ९१.३२ टक्के
- कोल्हापूर: ९३.६४ टक्के
- अमरावती: ९१.४३ टक्के
- छत्रपती संभाजीनगर: ९२.२४ टक्के
- नाशिक: ९१.३१ टक्के
- लातूर: ८९.४६ टक्के
- नागपूर: ९०.५२ टक्के
- मुंबई: ९२.९३ टक्के
बारावीचा शाखानिहाय निकाल
शाखा | निकाल |
विज्ञान | ९७.३५ टक्के |
कला | ८.५२ टक्के |
वाणिज्य | ९२.६८ टक्के |
व्यवसाय अभ्यासक्रम | ८३.०३ टक्के |
आयटीआय | ८२.०३ टक्के |
परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्याचे आढळलेल्या १२४ परीक्षा केंद्रांची कसून चौकशी
बारावीची परीक्षा ज्या परीक्षा केंद्रांवर पार पडली, त्या एकूण ३३७३ परीक्षा केंद्रांपैकी १२४ परीक्षा केंद्रांची चौकशी होणार आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं आढळल्यामुळे या केंद्रांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान, केंद्रांची चौकशी करताना, केंद्रांवर परीक्षेवेळी झालेला गैरप्रकार सिद्ध झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार आहे.
कॉपी प्रकरणात १२४ केंद्रांची चौकशी
गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेवेळी कॉपी होण्याची प्रकरणे वाढली आहेत. नव विभागीय मंडळात कॉपी प्रकरणी १२४ केंद्रांवर चौकशी करुन त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यात पुण्यातील ४५, नागपुरातील ३३, छत्रपती संभाजी नगरमधील २१४, मुंबईतील ९, कोल्हापुरातील ७, अमरावतीतील १७, नाशकातील १२, लातुरातील ३७ अशा एकूण ३७४ कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बारावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्य
- बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
- खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी १२.३८ आहे.
- बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्या कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, आईचे नाव आवश्यक
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिलं नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल कसा पाहाल?
- सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटnic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या हॉल तिकीटावरील क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा राज्यभरात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी मुलांची आकडेवारी ८,१०३४८ होती, तर मुलींची आकडेवारी ६,९४,६५२ होती. तर ३७ ट्रान्सजेंडर परीक्षेला बसले होते.