
Navimumbailive.com@gmail.com- 9619197444
नवी मुंबई : महापालिका आस्थापनेवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कामगारांची पालिका आस्थापनेवरील सेवा कायम करण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगताना महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविल्यास प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करू अशी सहकार्य करण्याची ग्वाही नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना दिली.
चर्चेच्या सुरूवातीलाच नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी एएनएम, स्टाफ नर्स, बहूउद्देशीय कामगारांचे वेतन वाढविल्याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानले. मागील बैठकीत संबंधित कामगारांच्या समस्या पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताना संबंधित कामगारांचे वेतन वाढविण्याची मागणी केली होती. इंटकच्या मागणीची तात्काळ दखल घेत पालिका आयुक्तांनी एएनएमची २० हजार १३ रूपयांवर ३५ हजार वेतनवाढ, स्टाफ नर्सचा ३० हजार ४०० वरून ४५ हजार वेतनवाढ, स्टाफ नर्स २० हजारावरून ४५ हजार वेतनवाढ करण्यात आली. पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कामगारांची वेतनवाढ झाल्याबद्दल नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानले व यापुढेही कामगारांच्या समस्यांवर सकारात्मक सहकार्याचा प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चर्चेदरम्यान कामगार नेते रवींद्र सावंत यांनी, महापालिका आस्थापनेवर गेल्या अनेक वर्षापासून ठोक मानधनावर काम करत आहेत. यामध्ये शिक्षक, परिवहन व आरोग्य, घनकचरा, कर विभागाचे कर्मचारी व अन्य आस्थापनेतील सरसकट सर्व कामगार कोरोना काळात नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. आज ना उद्या आपली प्रशासनात सेवा कायम होईल या आशेवर हे कामगार पालिका प्र्रशासनात इमानेइतबारे काम करत आहेत. त्यांची वयोमर्यादा उलटून गेल्याने अन्यत्र त्यांना रोजगारही मिळणे अवघड आहे. सध्या कोरोनासारख्या आव्हानात्मक स्थितीत हे ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत. त्यांची सेवा पालिका प्रशासनाने कायम करणे आवश्यक आहे. कायम सेवा हा धोरणात्मक निर्णय आहे. आपण त्याबाबत प्रस्ताव बनवून सरकारकडे पाठवून द्यावा व मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करावा. ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी आपण पाठविलेला प्रस्ताव मंजुर करण्यासाठी आम्ही काँग्र्रेसच्या माध्यमातून मंत्रालयीन पातळीवर प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करून आपणास सहकार्य करू. ठोक मानधनावरील कामगारांची सेवा लवकरात लवकर कायम होणे आवश्यक आहे. आपण याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा अशी भूमिका आयुक्तांसमोर मांडली. आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याने कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी चर्चेदरम्यान शिष्टमंडळात पालिका अधिकारी व कर्मचारी यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.