
शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनिता मांडवेंची पालिका उपायुक्तांकडे तक्रार
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील सुरक्षाव्यवस्थेची पडताळणी करण्याची मागणी प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील काही समस्या शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. सध्या उद्यान बंद करण्याची वेळ सांयकाळी ७ आहे. तथापि हे उद्यान काल रात्री बंदच करण्यात आलेले नव्हते. असा प्रकार अधूनमधून नेहमीच घडतो. उद्यानातील वीज (लाईट) बंद असते. रात्रीच्या अंधारात गैरप्रकार अथवा दुष्कर्म झाल्यास यास जबाबदार कोण असणार, याचाही महापालिका प्रशासनाने खुलासा द्यावा. महापालिका प्रशासनाने उद्यानाच्या बाहेर वेळेबाबत माहिती फलक लावणे आवश्यक आहे. ज्यायोगे उद्यानात येणाऱ्या जनतेला वेळेबाबत माहिती पडेल. अनेकदा उद्यान रात्रीच्या वेळी बंद केले जात नसल्याने महापालिका प्रशासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील सुरक्षाव्यवस्थेची नियमितपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. उद्यानात जे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांचेही पोलिस व्हेरिफीकेशन होणे आवश्यक असल्याचे सुनिता मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.उद्यानातील सुरक्षा याबाबत महापालिका प्रशासन उदासिनता दाखवित आहे, समस्येचे गांभीर्य समजून घेत नाही. उद्यान अहोरात्र सुरू ठेवण्याच्या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांना गणवेशही उपलब्ध करून दिलेले नाहीत. उद्यानातील सुरक्षा व्यवस्थेचा पालिका प्रशासनाने वेळावेळी आढावा घ्यावा, नियमितपणे उद्यान वेळेवर बंद करावे, वेळेबाबत माहिती फलक बसवावा याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.