
नवी मुंबई : महापालिका प्रशासन नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छ भारत मिशनची जोरदार तयारी करत असतानाच दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनातील नेरूळ विभाग कार्यालय अतिक्रमणाकडे कानाडोळा करत खतपाणी घालत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.अंर्तगत रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी असतानाच हातगाडी घेवून विक्री व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही नेरूळ सेक्टर सहामध्ये वाढीस लागली आहे. त्याच अंर्तगत रस्त्यावर असणाऱ्या दुकानचालकांनी आपल्या मार्जिनल स्पेसवर पूर्णपणे अतिक्रमण करून समोरच्या पदपथावरही सामान ठेवून खुलेआमपणे व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशी करत आहेत. अतिक्रमणाकडे कानाडोळा करून खतपाणी घालणारे नेरूळ विभाग कार्यालय स्वच्छ भारत मिशनमध्ये कितपत सक्रिय योगदान देणार यावर आता स्थानिक रहीवाशी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.