
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गुरूवारी पहाटे बेलापुर गावातील घराघरात पाणी घुसले. त्या पार्श्वभूमीवर बेलापुर गावातील गटारांची सफाई युध्दपातळीवर करून पावसाळीपूर्व कामांचा अहवाल तातडीने मागविण्याची मागणी कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
मुसळधार पावसामुळे बुधवारी (२३ सप्टेंबर) बेलापुर गावात पाणी घराघरात घुसले. बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि गावातील घरामध्ये साचलेले गुडघाभर पाणी तसेच डोक्यावर कोरोनाची टांगती तलवार या पार्श्वभूमीवर बेलापुर गावच्या ग्रामस्थांनी मृत्यू जवळून अनुभवला आहे. यापूर्वी २००५ साली बेलापुर गावात पावसाळ्यामध्ये घरात पाणी घुसले होते. त्यानंतर आता १५ वर्षानी पाणी घरात घुसले आहे. पावसाळीपूर्व कामामध्ये गावातील गटारांची तळापासून सफाई झाली असती तर कदाचित गावातील घराघरामध्ये पाणी घुसले नसते, असे तेथील ग्रामस्थ सांगतात. पहाटेपासून सकाळपर्यत ग्रामस्थ घरामध्ये घुसलेले पाणी बाहेरच काढत होते. त्यातच पावसाच्या पाण्यात भिजल्याने, घरातील पाणी बाहेर काढण्यात बराच वेळ पाण्यात गेल्याने सर्दी, तापाच्या शक्यतेने ग्रामस्थांच्या डोक्यावर आता कोरोनाचे संकट उभे राहीले आहे. पावसाळीपूर्व कामांमध्ये बेलापुर गावातील गटारांची तळापासून सफाई झाली आहे अथवा नाही याची आपण खातरजमा करून घ्यावी. सफाई झाली असती तर कदाचित गटारे तुंबून पाणी घरामध्ये आलेच नसते, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपण बेलापुर गावातील गटारांची सफाई तळापासून करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. पावसाळीपूर्व कामे झाली नसतील तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. ग्रामस्थ सध्या भयभीत झाले असून आपण पालिकेच्या संबंधित विभागांना येथील गटारांची तळापासून सफाई करण्याचे आदेश देवून काम झाले अथवा नाही याची स्वत: खातरजमा करून घेण्याची मागणी मनोज मेहेर यांनी आपल्या निवेदनात केली आहे.