

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल(प्रतिनिधी) कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस झाल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाही, त्यासंदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता मार्केट यार्ड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत ठेवीदार व खातेदारांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी मार्गदर्शन करणार आहेत. कर्नाळा बँकेच्या पनवेल, खारघर, महाड अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. या शाखांमधून गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये व त्याच्याही आधीपासून खातेदारांना त्यांच्या मुदत ठेवींचे पैसे न देणे, चालू खात्यावरील पैसे देण्यालाही विरोध होणे, आरटीजीएससाठी मोठमोठ्या रांगा लावल्यानंतरही ते न होणे अशा तक्रारी वारंवार होत आहेत. या बँकेत बोगस खाती उघडून शेकडो कोटी रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपास केल्याचेही उघडकीस आले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाळा बँकेच्या घोटाळेबाज कारभारामुळे अनेक महिन्यापासून ठेवीदार, खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही. त्यामुळे ठेवीदार, खातेदार हवालदिल झाले आहेत. त्यांना पैसे मिळवून देण्याकरिता माजी खासदार किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शनिवारी होणारी हि बैठक विशेषत्त्वाने महत्वाची असणार आहे. त्यामुळे या बैठकीस संबंधित खातेदार. ठेवीदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.