Home Uncategorized कोरोनामुक्त गावासाठी सकारात्मक पाऊल

कोरोनामुक्त गावासाठी सकारात्मक पाऊल

0 161

        कोरोना कोरोना करत दोन वर्षे सरली… आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  सर्वात प्रभावी उपाययोजना ठरली ती म्हणजे लॉकडाऊन. सारखा सारखा लॉकडाऊन जनतेला काय शासनालाही परवडणार नाही. शासनाने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या. जनतेनेही शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळेच आज दूसऱ्या लाटेचाही सामना यशस्वीपणे करता आला.  आता तिसऱ्या लाटेला कसे थोपवता येईल यासाठी शासनाचे कशोसीने प्रयत्न चालू आहेत. शक्यतो तिसरी लाट येऊच नये,यासाठी शासन नवनवीन उपाययोजना आखत आहे. राज्यातील अनेक सरपंच व गावांनीसुध्दा कोरोनाला आपल्या गावच्या वेशीवर रोखण्याचा विविध चांगले उपक्रम राबविलेले आहेत.

            मागच्या वर्षी शहरी भागात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात होता. कोरोनाच्या भितीने शहरातील जनता मोठया संख्येने आपापल्या गावी गेली. त्यामुळे कोरोना ग्रामीण भागातही पोहोचला आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपवायचे असेल तर, गावपातळीवरील ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यातसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

            आपले राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये कोरोनावर मात करण्याची जिद्द उत्पन्न व्हावी ‘कोरोनामुक्त गांव स्पर्धा योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचांनी गावाचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी व शासनाच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून  ‘माझे गाव, कोरोना मुक्त गाव’ चे ध्येय लवकर साध्य करावे असे आवाहन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केले आहे.

कोरोनाचे समुळ उच्चाटण करण्यासाठी ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना’ या स्पर्धेत जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेणे आवश्यक आहे.या स्पर्धेतील नियमानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर पाच पथकांची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी नेमून दिलेली कार्ये करणे, निकषानुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीने स्वयंमुल्याकन संबंधित गट विकास अधिकारी यांना  सादर करावायाचे आहे. पथकांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

            पथक क्रमांक-1 कुटूंब सर्वेक्षण पथक (ग्रामपंचायत प्रभाग निहाय)- सदर पथक वार्ड, तांडा, वाडी अथवा वस्तीनिहाय ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका/अंगणवाडी सेविका/आशा वर्कर/जिल्हा परिषद शिक्षक तसेच अन्य संस्थेचा प्रतिनिधी (स्वयंसेवक) इत्यादी सदस्यांच्या समावेश करून संबंधित ग्रामपंचायतीनी पथकाची स्थापना करावी. हे पथक कुटूंबातील प्रत्येक सदस्याची कोविड-19 संबंधित आजाराची लक्षणे ऑक्सीजन पातळी, ताप, सर्दी, खोकला, थकवा आणि इतर लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या नोंदी घेणे, प्रत्येक कुटूंबाला भेट देताना कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून कुटूंबातील वृध्द व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांची घ्यावयाची काळजी यांचे नियम समजावून सांगणे, AUTOIMMUNE DISEASE श्वसनासंबंधीचे दमा किंवा इतर आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब (HYPER TENSION) आजाराची माहिती घेणे व तद्संबंधीत आजाराची व्यक्ती आढळल्यास अशा रुग्ण व्यक्तींची यादी करणे व त्यांना योग्य उपचार घेणे व त्याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करणे ही सर्व कामे करेल.

            पथक क्रमांक-2 विलगीकरण कक्ष स्थापन करून पुढीलप्रमाणे कार्ये करण्यात यावे- कोविड-19 विलगीकरण कक्ष सरकारी नियमानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपचांयतीमधील कार्यरत अधिकृत डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात यावे. त्यात दोन स्वतंत्र कक्ष तयार करून त्यामध्ये बाधित व्यक्ती आणि संपर्कातील व्यक्तींना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात यावे, कोविड-19 विलगीकरण कक्षात 24 तास गरम पाणी ठेवण्यात यावे व शौचालय स्वच्छ ठेवावीत, कोविड बाधित रुग्णांच्या आहार व औषध उपचारावर नियमित लक्ष ठेवणे, गावातील रुग्णांची लक्षणे वाढत असल्यास तात्काळ हेल्पलाईन पथकातील डॉक्टरांना सूचित करणे.

            पथक क्रमांक-3 कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात भरत करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक- विलगीकाण कक्षातील लोकांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात ॲडमीट करण्याची गरत असेल त्यासाठी गावातील उपलब्ध गाडया त्यांच्या येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक ग्रामपंचायतीच्या स्तरावर गावातील वाहनचालकांची स्वंयसेवक म्हणून निवड करून पथकांची स्थापना करावी.

            पथकाची कार्ये- पथकातील वाहन चालकाने रुग्णासाठी वापरात असलेल्या वाहनात वाहन चालकाच्या सीटच्या मागे प्रोटेक्टिव्ह शिल्ड लावणे, प्रोटेक्टिव्ह शिल्डच्या मागे रुग्णांना बसून हॉस्पिटलला घेऊन जाणे व लगेच गाडी निर्जंतुक करणे, या पथकातील वाहन चालकांनी केलेल्या कार्यामुळे रुग्ण स्वत:च्या कुटूंबातील किंवा इतर व्यक्तीना तपासणीसाठी सोबत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रुग्णाबरोबर थेट संपर्क टाळल्यामुळे कोविड-19 चा प्रसार रोखण्यास मदत होईल.

            पथक क्रमांक-4 कोविड हेल्पलाईन पथक- सदर पथकामध्ये गावातील खाजगी डॉक्टर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र/केंद्र येथील डॉक्टर, फॉर्मासिष्ट (औषध निर्माता) आणि इतर क्षेत्रातील लोकांचा समावेश करून ग्रामपंचायतीने डॉक्टर हेल्पलाईन पथकांची स्थापना करावी.

            कोविड-19हेल्पलाईन पथकाची कार्य- कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने डॉक्टरांचे सहाय्य घेऊन चालू करण्यास मदत करणे, रुग्णाची वेळोवेळी तपासणी करणे व आवश्यक तपासण्या नामपात्र दरात करणे, आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हयाच्या ठिकाणी मुख्य रुग्णालयात भरती करणे, रुग्ण ॲडमिट करतना बेडच्या उपलब्धतेबाबत व उपचारादरम्यान औषधांच्या कमतरतेबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे, कोविड-19 या आजारानंतर मानवी शरीरात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. उदा.नवीनच आढळलेला म्युकॉरमायकोसिस आजाराशी साधर्म्य लक्षणाची माहिती देणे व पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात तातडीने पाठविण्याची व्यवस्था करणे, विशेष म्हणजे लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी कोविड-19 च्या संबंधीत सर्व सर्व नियम माहिती वेळोवेळी गावातील कुटूंबापर्यंत पोहचविणे.

            पथक क्रमांक-5 कोविड-19 लसीकरण पथक- राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोविड-19 लसीकरण करण्यासाठी तपासणीसाठी ग्रामपंचायतीच्या संबंधित वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र आरोग्य सेविका/आरोग्यसेवक, खाजगी डॉक्टर, स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी अशा सदस्यांचा समावेश करून पथकांची स्थापना करावी. हे पथक शासकीय नियमानुसार वय वर्षे 45 विशेषत: जुने आजार उदा.मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब इत्यादी असणाऱ्या व्यक्तींचे पथकाच्या माध्यमातून प्राधान्याने कोविड-19 चे लसीकरण करण्यात यावे, लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी अगोदर तयार करून त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंसेवकामार्फत नोंदणी करणे, शासनाच्या धोरणानुसार कोविड-19 लसीकरणाच्या बाबतीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रथम कोविड प्रतिबंध लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्यात येईल असे नियोजन करणे, गावातील नागरिकांची वेळोवेळी ॲन्टीजन टेस्ट करण्याचे ही काम करेल.

            सदर योजनेच्या निकषानुसार गुणांकन स्वयंमुल्याकन ग्रामपंचायती तयार करून 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे पुरस्कारासाठी निवड होण्याच्यादृष्टीने सादर करतील. प्राप्त झालेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या स्वयंमुल्याकनगट विकास अधिकारी हे तपासणी करून सर्वाधिक गुण प्राप्त 10 ग्रामपंचायतींची यादी तयार करून आवश्यक अहवालासह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे प्राप्त गुणांकन यादीमधील सर्व गावांची तपासणी करून जिल्हयातून सर्वाधिक गुण प्राप्त 3 गावांची शिफारस उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर करतील. उपायुक्त (विकास) हेविभागातील सर्व जिल्हयांकडून प्राप्त झालेल्या गुणांकनाची पडताळणी करून विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने विभागवार प्रथम, द्वितीय आणि तृतीय सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायतीची अंतिम निवड करतील.

            या दोन्ही योजना मिळून प्रथम, द्वितीय  आणि तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना अनुक्रमे (1) रु.50 लाख, 2) रु.25 लाख, 3) रु.15 लाख इतका निधी ग्रामविकास विभागामार्फत विकास कामासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ग्रामपंचायतींना दिला जाईल. कोविड-19 व्यवस्थापन कोरोनामुक्त गाव स्पर्धेत विजेता ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम वितरीत करण्यात येईल. कोरोनामुक्त गांव स्पर्धेसाठी निकषानुसार सर्वात जास्त गुण प्राप्त ग्रामपंचायतींना राज्यातील 6 महसूली विभाग निहाय प्रत्येक महसुल विभागातून प्रथम बक्षीस रु.50 लाख, रु.25 लाख, रु.15 लाख असे तीन विभागवार पुरस्कारांची रक्कम वितरीत करण्यात येईल. निकषानुसार मुल्यांकन करून गुण देण्यासाठी दि.1 जून 2021 ते 31 मार्च 2022 हा कालावधी ग्रामपंचायतींनी केलेले कार्ये विचारात घेण्यात येणार आहे.

            या योजनांकरिता निवडण्यात येणारी ग्रामपंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पध्दतीने पारदर्शकपणे निवड करण्यात येईल. आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत पुरस्कार वितरण व कोविड-19 व्यवस्थापन कोरोनामुक्त गांव स्पर्धेत विजेता ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम जिल्हयाच्या ठिकाणी एकत्रित कार्यक्रमात वितरीत करण्यात येईल.

कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेसाठीचे निकष व गुणांकन पुढीलप्रमाणे आहेत. 1) कोविड-19 व्यवस्थापनासाठी ग्रामस्तरावर कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे. त्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, गावातील सर्वसामान्य असणाऱ्या व्यक्तीचा समावेश करणे. 2) ग्रामस्तरावर मुख्य समितीच्या अंतर्गत विविध पथकांची निर्मिती करणे त्यात आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टर व गावातील स्वयंसेवक यांचा समावेश करणे. 3) कोरोनामुक्त गाव होण्यासाठी कोरोना बाधीत कुटूंबाचे सर्वेक्षण व कॉनटॅक्ट ट्रेसिंग करणे. 4) ANTIGEN TEST ची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करणे व संशयित रुग्ण संख्येच्या प्रमाणात. 5) ANTIGEN TEST मध्ये POSITIVE आढळलेल्या रुग्णांना तत्काळ पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये पाठविणे. 6) ANTIGEN TEST मध्ये         NEGETIVE आहे परंतु लक्षणे दिसतात अशा व्यक्तींना संशयित कोविड रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात ठेवणे. 7) रुग्णांना विलगीकरण कक्ष किंवा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था अल्पदरात करणे. 8) कोविड-19 विलगीकरण कक्षात गरम पाणी/वीज/स्वच्छता/मास्क व सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करणे तसेच शौचालयाची साफसफाई नियमितपणे करणे. 9) गावातील खाजगी डॉक्टरांचा व फार्माशिष्ट यांचा कोविड-19 साठी सक्रिय सहभाग रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी आहार आणि औषधाविषयी मार्गदर्शन करणे लोकसंख्येच्या हजारी प्रमाणात. 10) कुटूंबातील सर्व सदस्य POSITIVE आल्यावर पथकातील स्वयंसेवकामार्फत आवश्यक ती मदत करणे. 11) एखाद्या शेतकरी कुटूंबातील सर्व सदस्य कोविड-19 POSITIVE आल्यावर त्यांच्याकडील उत्पादित दुध व भाजीपाला अनुक्रमे दुधडेअरी व संबंधित मार्केटला स्वयंसेवकामार्फत पोहच करणे. 12) दूध उत्पादक संस्था, विविध कार्यकारी विकास सोसायटी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, तंटामुक्त गाव समिती, पतसंस्था यांचा सक्रीय सहभाग. 13) कोरोना बाधित कुटूंबाचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांशी आणि संबंधित डॉक्टरांशी कोविड-19 हेल्पलाईन समिती प्रमुखाने नियमित संवाद साधणे. 14) कोरोना विरहित सुरक्षित कुटूंबाची विशेष नोंद ठेवणे व त्या कुटूंबाना कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी जनजागृती करणे. 15) कोविड-19 ची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तात्काळ संबंधित पथकातील स्वयंसेवकामार्फत पुढील उपचारासाठी  व्यवस्था करणे. 16)  कोविड-19 लसीकरणासाठी मदत करणे व उपलब्ध लसीचे शासकीय नियमानुसार योग्य वाटप. 17) लहान बालकांचे, गरोदर मातांचे सर्वेक्षण करणे. 18) जनजागृतीसाठी केलेले प्रभावी उपाययोजना, विविध तंत्रज्ञानाचा वापर. 19) नोकरीनिमित्त किंवा व्यवसायनिमित्त (चाकरमाने) बाहेरगावी असणाऱ्या व्यक्ती घेतलेली खबरदारी. 20) पथकातील एकही स्वयंसेवक कोरोना बाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे. या सर्व निकषास निकषाच्या प्रमाणानुसार 100 टक्के 2 गुण, 75-99 टक्के 1 गुण, 50-74 टक्के 0.50 गुण असतील तर कमाल गुण 2 असतील.

मृत्यूदर कमी असावा (गावातील लोकसंख्येच्या हजारी दराप्रमाणे) या निकषास निकषाच्या प्रमाणानुसार संख्या 0-2 गुण, 1-10 संख्या 1 गुण, 10 पेक्षा जास्त संख्या 0.50 गुण असतील तर कमाल गुण 2 असतील. तसेच आई वडिलांचे दुदैवाने कोरोनामुळे निधन झाल्यास अनाथ मुलांचा/मुलींचा सांभाळ करणे 100 टक्के 4 गुण, 75-99 टक्के 3 गुण, 50-74 टक्के 2 गुण असतील तर कमाल गुण 4 याप्रमाणे एकूण 50 गुण असतील. 

आतापर्यंत ज्या ग्रामपंचायतींनी कोरोना काळात उत्तम काम केले आहे.अशा ग्रामपंचायतींच्या कामांची दखल घेत मा.मुख्यमंत्री महोदंयानी राज्याच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामधून याचा संदर्भ देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. मा.मुख्यमंत्री महोदंयाच्या आवाहनानुसार आपण आपले कुटूंब, आपला मोहल्ला, आपली वाडी-वस्ती, आपले गांव कोरोनामुक्त केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

******* 

प्रविण रा.डोंगरदिवे

माहिती सहाय्यक

विभागीय माहिती कार्यालय

कोकण विभाग, नवी मुंबई

NO COMMENTS

Leave a Reply