Home Uncategorized कोव्हीशील्डचा आणखी 20 हजार लसींचा साठा प्राप्त

कोव्हीशील्डचा आणखी 20 हजार लसींचा साठा प्राप्त

0 116

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील 49 केंद्रांवर कोव्हीड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: 7 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण प्रक्रियेला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जात असून आत्तापर्यंत 1 लाख 75 हजार 873 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये आज शासनाकडून आणखी 20 हजार कोव्हीशील्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत अहोरात्र 24 x 7 लसीकरण करण्यात येत आहे तसेच तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. त्यासोबतच वाशी सेक्टर 5 येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रामध्ये 4 बूथ सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व  केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 21 खाजगी रुग्णालयांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या रु. 250/- प्रति डोस दराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.

      1 एप्रिलपासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले असून अशा 74124 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. सध्या नव्याने पहिलाच डोस घेणा-या नागरिकांना कोव्हीशील्ड लसीचा डोस दिला जात आहे. कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन झाल्यानंतर दुसरा डोस 6 ते 8 आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.

      ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसराही डोस कोव्हॅक्सिनचाच घेणे आवश्यक असून तो 4 ते 6 आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्याची सुविधा वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिका रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

      यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोव्हीशील्ड अथवा कोव्हॅक्सिन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस विहित कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.

      45 वर्षावरील प्रत्येक नागरिकाने कोरोनापासून बचावासाठी अतिशय सुरक्षित असलेले कोव्हीड लसीकरण करून घ्यायचे असून याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्र पातळीवरही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.         

NO COMMENTS

Leave a Reply