Home Uncategorized भाजपाने तात्काळ माफी मागावी : सचिन सावंत

भाजपाने तात्काळ माफी मागावी : सचिन सावंत

0 183

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : भारतीय जनता पार्टी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आली आहे. छत्रपतींचे नाव फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरणाऱ्या भाजपाला शिवराय यांची कन्या व पत्नी यांच्यातला फरकही समजला नाही. सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते पण भाजपाच्या विकृत बुद्धीच्या लोकांनी कन्या आणि शिवरायांची पत्नी यांचे नाव वेगळे असल्याचे सांगून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देत ‌अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपाने तात्काळ माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांची जातीभेदविरोधी भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसतर्फे मी महाराजांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू यांचे उदाहरण देत असताना वाल्हे गाव येथील महार समाजाच्या काही लोकांना आपले माहेरचे भोसले नाव कसे दिले ही घटना ट्विटरव्दारे विषद केली होती. यावर भाजपाने सकवारबाई या त्यांच्या पत्नी असताना पत्नीची कन्या करुन टाकली आणि शिवरायांचा अवमान केला आणि शिवरायांचा खोटा इतिहास सांगितला अशी बोंब महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटरवरून ठोकली. ते ट्विट भाजपाचे वरिष्ठ नेते व मंत्र्यांनी रिट्विटही केले होते व काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्नही केला होता. यावर काँग्रेसतर्फे महाराजांची कन्या व महाराजांची एक पत्नी या दोघींमध्ये नामसाधर्म्य होते व दोघींचे नावही सकवारबाई होते हे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.

प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंके यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक’ या पुस्तकात महाराजांची कन्या सकवारबाई व पत्नी सकवारबाई यांचा उल्लेख करण्यात आलेला असून त्यामध्ये शिवापूरयादी तसेच तंजावरच्या शिलालेखात महाराजांची कन्या सकवारबाईंच्या जन्माचा उल्लेख आहे, असे म्हणत यासंदर्भात प्रख्यात इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘शिवाजी: हिज लाइफ अँड टाइम्स’ या पुस्तकाचा दाखला दिला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नावही सकवारबाई होते आणि त्यांचे माहेरचे आडनाव गायकवाड होते हे स्पष्ट केलेले आहे. असाच उल्लेख इतिहास संशोधक डॉ. अशोक राणांच्या “शिवचरित्राची शिकवण” पुस्तकातही आहे. व तसाच उल्लेख डॉ. अनिल सिंगारे यांच्या लेखनातही आहे.

भाजपाने अकलेचे तारे तोडले त्याबद्दल तात्काळ माफी मागावी. भाजपा हा शिवरायांच्या इतिहासाचे विकृत्तीकरण करणाऱ्या व त्यांचा इतिहास संपवणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानणारा पक्ष आहे. शिवस्मारकातही भ्रष्टाचार करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या पक्षाकडून अधिक अपेक्षा काय असणार? शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागेल यापेक्षा अधिक पातक ते काय असेही सावंत म्हणाले.

NO COMMENTS

Leave a Reply