Home टॉप न्यूज ‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

स्वराज्यनिर्मितीच्या काळात स्वत:च्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेवून तानाजी मालुसरे ज्यावेळी रायगडावर आले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कोंढाणा किल्ल्यावर चढाई करण्याच्या तयारीत होते. तानाजी यावेळी शिवछत्रपतींना म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे. या इतिहासकालीन दृश्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक हे होय. मी स्वत: डोंबिवलीला राहत असून आमदार संदीप नाईकांचा आमचा अधिवेशनातच संबंध येतो. अधिवेशनाचा अपवाद वगळता इतर वेळी मंत्रालयात भेट झाली तरच. अन्यथा पंढरीच्या वारीप्रमाणे अधिवेशनात आमची भेट ठरलेलीच असते. २५ जून २०१९, मंगळवार, पावसाळी अधिवेशनाचे कामकान नेहमीप्रमाणे सुरू झालेले. आमदार संदीप नाईकांमध्ये कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. माझ्यासोबत अधिवेशन वार्ताकंन करणारे काही पत्रकारही यावेळी होते. त्यांची प्रकृती व आजारपण पाहून आम्ही त्यांना विनंती केली की, आमदारजी आज घरी जा, तब्येत बरोबर नाही. आराम करा, डॉक्टरकडे जावून दवापाणी करा. त्यावेळी आमदार संदीप नाईकांनी आम्हाला एकच मार्मिक उत्तर दिले, ते म्हणजे – ‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’. ज्या मतदारसंघाचा आमदार उभे राहवत नसताना, शरीरात कमालीचा अशक्तपणा जाणवत असतानाही आपल्या शहराचे, मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, समस्यांकडे उभ्या महाराष्ट्राचे तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात येतो. केवळ येत नाही तर दोन लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारतो, एका विषयातील चर्चेत अर्धा तास सहभागी होत नवी मुंबईतील ग्रामस्थांची घरे अजून नियमित का होत नाहीत यावर राज्य सरकारला धारेवर धरतो, हे पाहिल्यावर आमदार संदीप नाईकांची नवी मुंबईप्रती असणारी आस्था, कळकळ आणि स्वत:च्या आजारपणापेक्षा माझे शहर, माझा मतदारसंघ, माझे मतदार महत्वाचे आहेत, हे त्यांनी कृतीतून महाराष्ट्रातील सर्वच आमदारांना दाखवून दिले. ज्या आमदाराला अशक्तपणामुळे बोलता येत नाही, उभे राहता येत नाही, असे असतानाही दिवसभर अधिवेशनात नवी मुंबईच्या समस्यांवर आवाज उठवित राज्य सरकारला धारेवर धरतो, त्या शहरातील समस्यांना फार काळ यापुढे प्रलंबित राहू शकत नाही, याचे संकेतच अधिवेशनातील घडामोडीदरम्यान महाराष्ट्रातील आमदारांना जवळून पहावयास मिळाले.

आमदार संदीप नाईकांबाबत आमच्या संग्रही विविध माहिती आहे. पण ती इतरांकडून ऐकून होतो आणि वर्तमानपत्रातून वाचून होतो. पण मंगळवारी विधानसभा अधिवेशनात आमदार संदीप नाईक नावाचे हे एक विलक्षण रसायन काय आहे, हे जवळून पहावयास मिळाले आणि अनुभवयास मिळाले. संदीप नाईक सर्वप्रथम नगरसेवक झाल्यावर २००५ ते २०१० असे सलग पाच वर्षे ते महापालिका स्थायी समिती सदस्य होते. सुरूवातीची दोन वर्षे सदस्य राहील्यावर नंतरची तीन वर्षे ते स्थायी समिती सभापती राहीले आहेत. संदीप नाईकांच्या अगोदर नवी मुंबई महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदावरून ज्यांनी कारभार पाहिला, त्यांनी वातानूकूलित कार्यालयात बसून कारभार पाहिला. पण पायवाटेवरून जाणाऱ्यांना इतिहास घडविता येत नाही. जे वेगळी वाट चोखळतात, त्यांना इतिहास घडविण्याचा अधिकार असतो आणि इतिहासलाही त्यांची दखल ही घ्यावीच लागते. आमदार संदीप नाईक यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा कारभार वातानुकूलित कार्यालयात बसून हाकण्यावर भर न देता त्यांनी सर्वसामान्य, गोरगरीब, तळागाळातल्या नवी मुंबईकरांमध्ये जावून केला. पावसाळीपूर्व कामे होतात अथवा नाही, प्रशासनाला त्यांचे गांभीर्य कितपत आहे, याचा त्यांनी प्रभागाप्रभागात जावून आढावा घेतला. नाले-गटारे प्रत्यक्ष पाहून नालेसफाईचा आढावा घेतला. जनतेशी सतत संपर्कात राहण्यासाठी, सुसंवाद घडविण्यासाठी ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवून प्रभागाप्रभागातील रहीवाशांशी संपर्क साधत त्यांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांची व नागरी असुविधांची माहिती जाणून घेतली. एकदा तर वाशी १७ मधील शालांत परिक्षेच्या कार्यालयाजवळील आणि विश्वशांती हॉटेलसमोरील नाला तुंबलेला असताना संदीप नाईक गळ्याएवढ्या पाण्यामध्ये तुंबलेल्या नाल्यात उतरले आणि नालेसफाईला सुरूवात केली. मॉडर्न कॉलेजच्या मुलांनी व उपस्थित नवी मुंबईकरांनी हे जवळून पाहिले आहे. याच नगरसेवक संदीप नाईकांच्या कामाची पोचपावती ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी २००९च्या विधानसभा निवडणूकीत दिली आणि संदीप नाईकांना विधानभवनात नवी मुंबईकरांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमदार संदीप नाईकांनीही आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सातत्याने परिश्रम केले, कोठेही विश्वासाला तडा जावू दिला नाही. मतदारांनी हे जवळून पाहिले. मतदारही आमदार संदीप नाईकांच्या परिश्रमाशी प्रामाणिक राहीले आणि सर्वत्र २०१४ साली मोदी लाटेचे वादळ असतानाही मतदारांनी संदीप नाईकांची पाठराखण करत त्यांना पुन्हा विधानसभेत नवी मुंबईकरांची सेवा करण्यासाठी पाठवून दिले. २००९ ते २०१४ या पाच वर्षाच्या कालावधीत विधानभवनातील कामकाजात शंभर टक्के हजेरीही आमदार संदीप नाईकांच्या खात्यात जमा आहे.

पुन्हा विषय २५ जून २०१९च्या म्हणजेच कालच्या घडामोडींकडे वळवितो. अंगी कमालीचा अशक्तपणा, उभे राहण्याचे त्राण नसतानाही, शरीर तापाने फणफणत असतानाही आमदार संदीप नाईक कशासाठी आले हे जाणून घेण्यासाठी आम्ही अधिवेशन कव्हर करण्यासाठी आलेलो मंत्रालयीन पत्रकार विधानसभेच्या पत्रकार कक्षात जावून बसलो. नवी मुंबईतील विद्युत असुविधा, अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या व नवी मुंबईकरांच्या जिवितास निर्माण झालेला धोका याबाबत आमदार संदीप नाईकांनी पोटतिडकीने भूमिका मांडली. लोडशेडींगच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता होण्यासाठी नवी मुंबईकर गेल्या काही वर्षापासून परयुनिटमागे अतिरिक्त पैसे मोजत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. वीज खात्याला महाराष्ट्रातून अधिकाधिक उत्पन्न मिळत असताना नवी मुंबईकरांना समस्येत खितपत ठेवण्याचा व असुविधेच्या चक्रव्यूहात ठेवण्याचा वीज विभागाला अधिकार नसल्याचे आमदार संदीप नाईकांनी ठणकावून सांगितले.

नवी मुंबईत असणाऱ्या पुलांचावरही (ब्रीज) संदीप नाईकांनी सडेतोड भूमिका मांडली. दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबईतील सर्वच पुलाचे मग ते सिडको, एमएमआरडीए, महापालिका कोणीही बांधलेले असो याचे लवकरात लवकर ऑडीट करण्याची मागणी आमदार संदीप नाईकांनी सभागृहातील चर्चेदरम्यान राज्य सरकारकडे केली. धोकादायक पुलामुळे दुर्घटनेचे व जिवितहानीचे गांभीर्यही त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. या दोन घडामोडीवरील चर्चेत सहभागी झाल्यावर आणि नवी मुंबईकरांची भूमिका मांडल्यावर सभागृहात ‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याबाबत’ यावर अर्धा तास वेळ चर्चेसाठी राखून ठेवला होता. याही चर्चेत सहभागी होत आमदार म्हणून नाही तर नवी मुंबईचा एक प्रकल्पग्रस्त म्हणून सडेतोड भूमिका मांडत आता आणखी या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवू नका, लवकरात लवकर मार्गी लावा अशी स्पष्ट विचार आमदार संदीप नाईकांनी मांडले.

जो आमदार जिवाची पर्वा न करता आपल्या मतदारसंघासाठी भांडतो, शहरासाठी भांडतो याचे उत्तम उदाहरण २५ जून रोजी विधानभवनात आमदार संदीप नाईकांच्या माध्यमातून जवळून पहावयास मिळाले. संदीप नाईक तुम्ही माणूस म्हणून ग्रेट आहातच, परंतु एक आदर्श लोकप्रतिनिधी लाभला म्हणून तुमचे शहर, तुमच्या शहरातील मतदारही ग्रेट आहेत, हे आता आम्हाला आमच्या कल्याण-डोंबिवलीमध्ये जावून सांगण्याची वेळ आली आहे.

: अॅड . महेश जाधव

पत्रकार

कल्याण

 

NO COMMENTS

Leave a Reply