सरकारचा विद्यार्थ्याएवजी डान्सबारची काळजी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ‘नीट’ परिक्षेवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. राज्य सरकारला डान्स बारची काळजी आहे, पण विद्यार्थ्याची नाही, असा टोला हाणत या विषयासंर्दभात सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. राज्यांचे महत्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परिक्षेवरून गोंधळ सुरू आहे. राज्यात वैद्यकीय परिक्षेसाठी सीईटी होत असताना ‘नीट’चा घाट कशासाठी?, असा मुद्दा उपस्थित करत हजारो विद्यार्थी आणि पालकांनी या परिक्षेला विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारने न्यायालयात धाव घेवून आणखी दोन वर्षे ‘नीट’नको अशी मागणी केली. महाराष्ट्रासोबत इतर सात राज्यांनीही नीटबाबत निरनिराळे आक्षेप घेतले. परंतु सगळ्यांच्याच याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. ‘नीट’नुसार वैद्यकीयचे प्रवेश होतील, असे न्यायालयाने निक्षून सांगितले. त्यानंतर, राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मेडीकल सीईटी झाली असल्याने महाराष्ट्राला ‘नीट’मधून
वगळावे अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देईल, हे नक्की नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आणि भीती आहे.
या पार्श्वभूमीवर मेडीकलची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली.
‘नीट’चा गुंता सोडविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. तेव्हा, येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून काय करायचे ते ठरवू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले. देशात मोगलाई सुरू आहे का, असा सवाल करत, केंद्र सरकारला राज्याचे महत्व कमी करायचे असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. केंद्राला जे निर्णय घ्यायचे असतात, ते सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सुनावले जात असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. या सरकारला डान्सबारची काळजी आहे, विद्यार्थ्यांची नाही. उद्या विद्यार्थ्यांनी काही बरे-वाईट केले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला. व्यापारी, विद्यार्थी, पालक सर्वच या सरकारच्या विरोधात जावू लागले आहेत. त्यामुळे सरकार राहते की नाही, हे यांना तीन वर्षात कळेलच, असा सूचक इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार २४ जुलै रोजी होणारी नीट परीक्षाच वैद्यकीय प्रवेशासाठी वैध असेल. मात्र बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये रोष आहे. ही परीक्षा देवून मुलं नापास झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता ते विचारत आहेत.