संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मलेरीया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अधिक व्यापक स्वरुपात प्रतिबंधात्मक कार्यवाही आणि जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात मलेरीया, डेंग्यू आजारांबाबत १२७ जनजागृती शिबिरे घेण्यात आली आहेत.
सद्यस्थितीत नैसर्गिक हवामानात होत असलेला बदल व अनियमित पाऊस यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर दिसून येत असून प्रामुख्याने घरामध्ये साठविलेले स्वच्छ पाणी तसेच घराचे छत, बाल्कनी, छज्जा अशा ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यामध्ये मलेरीया / डेंग्यू आजाराचा प्रसार करणार्या डासांची उत्पत्ती होताना दिसते.
याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरीता प्रत्येक शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना सुट्टी असल्याने उपस्थिती जास्त असते हे लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील २१ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती शिबिरे घेण्यात येत आहेत. यामध्ये संबंधित कार्यक्षेत्रातील नगरसेवक यांचा सहभाग असल्याने शिबिरांतून प्रभावी जनजागृती करणे शक्य होत आहे.
शिबिरांतून प्रसिध्द केली जाणारी आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यांची माहितीप्रद हस्तपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, प्रदर्शन संच यामधून डास उत्पत्ती कशाप्रकारे होते, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावयाची पध्दती याची माहिती मिळून गट चर्चा व संवादातून आरोग्य शिक्षण केले जात आहे.
याशिवाय महानगरपालिका व खाजगी शाळा, महाविद्यालय यामधूनही आरोग्य शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत संदेश पोहचविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या रॅलीव्दारेही जनजागृती करण्यात येत आहे. आजार प्रतिबंधाकरीता अधिक व्यापक स्वरुपात प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येत असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गृह भेटी देऊन तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येत आहेत व प्रयोग शाळेत तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. यामध्ये मलेरीया रुग्णाचे निदान झाल्यास त्यांना त्यांच्यावर मोफत योग्य तो उपचार करण्यात येत आहे.
या स्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिका राबवित असलेल्या मलेरीया / डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता नागरिकांना आवाहन करण्यात येत असून हिवताप / डेंग्यू आजाराचा प्रसार करणार्या डासांची उत्पत्ती घरामध्ये व परिसरात साठलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने ते पाणी नियमित बदलावे तसेच कुठे पाणी साचलेले असल्यास ते काढून टाकावे. खिडक्यांना जाळ्या बसवून अथवा घरांमध्ये मच्छरदानीचा वापर करुन प्रतिबंध करावा. व्हेन्ट पाईप्सना आतील व बाहेरील बाजूस बारीक जाळी लावावी तसेच पाणी साचून राहील अशा घरातील वा परिसरातील अनावश्यक वस्तू शोधून काढून टाकाव्यात. घराच्या छतावर प्लास्टीक कागद / ताडपत्री याठिकाणीही पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आठवड्यातून एक दिवस पाणी साठवण्याची भांडी घासून कोरडी करुन ठेवावीत. हिवताप / संशयीत डेंग्यू रुग्ण आढळल्यास जवळच्या महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्रात / रुग्णालयात त्वरीत माहिती द्यावी आणि रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी घरी येणार्या आरोग्य कर्मचार्याला सहकार्य करावे.
महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालय येथे याकरीता मोफत उपचार होत असून या सर्व उपाययोजनांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मलेरीया / डेंग्यू आजार नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.